उन्हाळ्याच्या सुट्यात सुरू ठेवा शाळा; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:47 AM2019-04-22T11:47:07+5:302019-04-22T11:47:44+5:30
: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता उन्हाळ्यातही वर्ग घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आता उन्हाळ्यातही वर्ग घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. किमान अध्ययन क्षमतेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना यातून पूरक मार्गदर्शन करण्यासंदर्भात सर्व गटशिक्षण अधिकाºयांना सूचना केल्या आहेत.
विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात असरच्या धर्तीवर सीआरजी ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या चाचणीत विद्यार्थ्यांची वर्गानुरूप किमान अध्ययन क्षमता लक्षात आली आहे. चाचणीच्या अहवालावरून सर्व तालुक्यांचा डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.त्यानुसार कोणते विद्यार्थी, कोणत्या प्रकारात किमान अध्ययनक्षमता प्राप्त करू शकले नाही, याची माहिती शाळेला देण्यात आली आहे. नवीन सत्र सुरू होणाºयापूर्वी जे विद्यार्थी मागे आहेत, अशा विद्यार्थ्यांना वर्गानुरुप क्षमता प्राप्त करून द्यायची आहे. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पूरक मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवालही मागविण्यात आला आहे.
सीईओंच्या शाळेला भेटी
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शाळांना अकस्मात भेट देऊन गुणवत्ता वाढविण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेण्याचे आवाहन शिक्षकांना केले. यादव यांनी रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना भेटी दिल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळांमध्ये एकही विद्यार्थी यादव यांना दिसला नाही. हजेरीपटावर मात्र विद्यार्थी उपस्थित होते. यावर सीईओंनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.