शाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:06 AM2018-08-14T11:06:13+5:302018-08-14T11:08:34+5:30
ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे.
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या आणि पडक्या इमारती, अस्वच्छता, निरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, असे निराशादायी चित्र महापालिकेच्या अनेक शाळांचे बघायला मिळते. शासनाने अध्यापनाच्या पद्धती बदलल्या पण महापालिकेच्या शाळांमध्ये आजही तोच तो पणा कायम दिसतो. पण ज्या शाळेत प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो अशा निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. इमारत जुनी असली तरी, तिला कल्पकतेने बोलकी केल्याने, शाळेत आता विद्यार्थ्यांची किलबिलही वाढली आहे.
युनेस्कोनेही अशीच काहीशी संकल्पना मांडली आहे. त्यांच्या बिल्डींग अॅण्ड लर्निंग एड (बाला) या प्रकल्पाअंतर्गत भकास शाळांचे आंतरिक आणि बाह्य रूप सजवून त्यांना ‘चाईल्ड फ्रेंडली’ करण्याची ही संकल्पना आहे. याच संकल्पनेतून मुख्याध्यापिका शीला अथिलकर यांनी येथे काम सुरू केले. जनमंच या स्वयंसेवी संस्थेची त्यांना साथ मिळाली. मिळणाऱ्या वेतनातून त्यांनी शाळेच्या रंगरंगोटीवर खर्च केला आणि शाळेमध्ये काही बदल घडवून आणला. शाळेच्या आत प्रवेश केल्यास येथे भारताचा नकाशा काढलेला आहे. त्यात सर्व धर्म समभावाचा संदेश त्यातून दिला आहे. निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवे, झाडे वाचवा झाडे जगवा असा संदेश दिला आहे. निसर्गातील सौंदर्य कलेच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीवर रेखाटले आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, व्यायामाचे काय फायदे आहे, स्वच्छतेमुळे आरोग्य कसे सदृढ राहील, वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, आवश्यक तेवढाच विजेचा वापर करावा, अशा आशयाचे सामाजिक संदेश कार्टुन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले आहे. कुंचल्याच्या माध्यमातून भिंतीवर रंगछटा साकारून वातावरण निर्मिती केली आहे.
त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात झालेले कृतिशिल बदल हे वर्गामध्येही दिसून येत आहेत.
त्यामुळे शाळेत नियमित होत असलेली स्वच्छता, निटनेटकेपणा यामुळे विद्यार्थी रमायला लागले आहेत. खासगी शाळांच्या धर्तीवर स्वच्छ पाणी, कम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधासुद्धा मनपाच्या शाळेत उपलब्ध करून दिल्या आहेत.
शाळेची प्रगती असो वा अधोगती ही शिक्षकांवरच अवलंबून असते. ज्या कर्तव्यासाठी सरकार आपल्याला वेतन देते ते कर्तव्य जर प्रामाणिक केले तर नक्कीच बदल घडून येतो. मी शाळेसाठी तेच केले आहे. थोडा आर्थिक भार मलाही पडला आहे. पण आज या शाळेची दखल घेतली जात असल्याचे समाधान आहे. कदाचित या बदलामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या ६०० पर्यंत गेली आहे.
- शीला अथिलकर, मुख्याध्यापिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा, मनपा