स्कूल व्हॅन उलटली
By admin | Published: August 13, 2015 03:30 AM2015-08-13T03:30:43+5:302015-08-13T03:30:43+5:30
अजनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर टायर पंक्चर झाल्यामुळे एक स्कूल बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
नागपूर : अजनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर टायर पंक्चर झाल्यामुळे एक स्कूल बस उलटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. घटनेत पाच विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली. तर ८ ते १० विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
बुधवारी सकाळी झालेल्या या गंभीर घटनेत त्वरित मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संजय बोटरे ही स्कूल व्हॅन चालवित होता. तो रामदासपेठच्या सोमलवार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो. बुधवारी सकाळी रामेश्वरी ते अजनी पुलाकडे तो जात होता. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मतानुसार डीसीपी झोन ४ च्या कार्यालयाजवळ अचानक चालकाच्या सीटजवळील टायर पंक्चर झाला. यामुळे व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटला आणि रस्ता दुभाजकावर आदळून व्हॅन उलटली. अचानक झालेल्या या अपघातामुळे व्हॅनमधील विद्यार्थी घाबरले आणि ते आरडाओरड करीत होते. डीसीपी कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी दरवाजा आणि काच फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. व्हॅनचा चालक संजय बोटरे हा सुद्धा या अपघातात जखमी झाला. नागरिकांनी व्हॅनमधील विद्यार्थ्यांना त्वरित मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. समीक्षा भगवान गणवीर (१२), श्रेया पाठक (७), आंचल लक्ष्मण सोमकुवर (१५) आणि इतर दोन विद्यार्थ्यांना डोक्यावर जखम झाली.
त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. अजनी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. एका महिन्यात स्कूल व्हॅनचा अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. ७ जुलैला खरबी येथे अनियंत्रित झालेली स्कूल व्हॅन उलटल्यामुळे विद्यार्थी जखमी झाले होते.
आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी शाळेच्या वाहनांची तपासणी होत असूनही अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)