आजपासून शाळा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:52+5:302020-12-14T04:25:52+5:30
बहुतांश पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २०२० पासून ...
बहुतांश पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १६ मार्च २०२० पासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा आता सोमवार १४ डिसेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उघडणार आहेत. परंतु शाळेमध्ये आपल्या पाल्याला पाठविण्यासाठी केवळ २४,३३८ पालकांनीच लेखी संमती दर्शविली आहे. बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाही.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ६५७ शाळा असून, येथे १ लाख ३० हजार ४५४ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर ९ हजार १४७ वर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शासनाने यापूर्वी २६ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाही कोरोना चाचणी करण्याचे शिक्षकांना सांगितले. त्यावेळी जिल्ह्यातील १०० वर शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ९ डिसेंबरला शिक्षण विभागाने पुन्हा शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ३८ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शिक्षकांनी कोरोनामुक्त होईस्तोवर शाळेत येऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवणे. स्वच्छता राखणे, शाळेचे वेळापत्रक व इतर सर्व सूचना शिक्षण विभागाकडून यापूर्वी दिल्या होत्या. परंतु उद्या शाळा सुरू होत असल्याने आज रविवारला पुन्हा वेबिनारच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी आढावा घेऊन सूचनाही केल्या आहेत.
बॉक्स
शाळांचे निर्जंतुकीकरण, थर्मल गनचे वाटप
कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायमच आहे. त्यातच आता शाळाही सुरू होत आहे. हे सर्व लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये सुरू होत असलेल्या शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक शाळेला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्तीपत्रके आदी वितरित करण्यात आली आहेत.