नागपुरात शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 09:16 PM2021-06-18T21:16:57+5:302021-06-18T21:17:29+5:30
Schoolboy drowns in farm lake चिखल- मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीनपैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिखल- मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीनपैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयस्वाल शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उमदे उल्ला सलीम खान (वय १५), असे मृत मुलाचे नाव आहे. तो सुमितनगरजवळ राहत होता.
आठवीचा विद्यार्थी असलेला उमदे त्याच्या दोन मित्रांसह वाठोड्यातील जयस्वाल शाळेच्या बाजूला असलेल्या शिवारात फिरायला गेला होता. तिकडे या तिघांनी मोबाइलवर फोटो काढून घेतले. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास लिंबाच्या बागेजवळ गेले. तेथे त्यांनी फोटो काढून घेतले. बाजूलाच एक शेततळे आहे. त्याला कुंपणही घातले आहे. चिखलांनी पाय माखले असल्यामुळे हे तिघे शेततळ्यात उतरले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज नव्हता. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. बाजूलाच एक तरुण होता. त्याला हे दिसल्याने तो त्यांच्याकडे धावला. त्याने दोरी फेकून दोघांना पाण्याबाहेर काढले. उमदे मात्र पाण्यात बुडून मृत झाला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जयस्वाल शाळेजवळची मंडळी तिकडे धावली. त्यांनी वाठोडा पोलिसांना माहिती कळविली. वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. अग्निशमन दलालाही बोलवून घेतले. पावसामुळे चिखल असल्याने वाहन घटनास्थळापर्यंत जात नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहोचण्यास उशीर झाला. त्यांनी उमदेला पाण्यातून बाहेर काढले. सलीम खान मुस्ताक खान (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
परिसरात हळहळ
या घटनेचे वृत्त सुमितनगरात पसरताच रहिवासी हळहळ करू लागले. उमदेच्या कुटुंबात आई, वडील, दोन बहिणी आणि भाऊ असल्याचे पोलीस सांगतात. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे तीव्र मानसिक धक्का बसला आहे.