शाळांना परवानगी, मग कोचिंग क्लासेसला का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:54 PM2021-01-06T23:54:10+5:302021-01-06T23:55:31+5:30
coaching classes issue, nagpur news कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव ओस पडायला लागताच आणि लसीकरणाच्या दिशेने योग्य पावले पडताच शासनाने धार्मिक स्थळे, मॉल्ससह शाळा-महाविद्यालयांना मोकळीक दिली आहे. मात्र, ज्या कोचिंग क्लासेसच्या भरवशावर विद्यार्थी जगाशी स्पर्धा करण्यास तयार होतात, त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव ओस पडायला लागताच आणि लसीकरणाच्या दिशेने योग्य पावले पडताच शासनाने धार्मिक स्थळे, मॉल्ससह शाळा-महाविद्यालयांना मोकळीक दिली आहे. मात्र, ज्या कोचिंग क्लासेसच्या भरवशावर विद्यार्थी जगाशी स्पर्धा करण्यास तयार होतात, त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोचिंग क्लासेसवर समाजाकडून कायम आक्षेप घेतला जातो. मात्र, शासकीय शिक्षणव्यवस्थेच्या त्रुटींमुळेच कोचिंगचे महत्त्व वाढले, याकडे दुर्लक्ष केले जाते. कोचिंगच्याच भरवशावर विद्यार्थी बोर्डाच्या आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. एका अर्थाने शिक्षणव्यवस्थेला समांतर अशी ही कोचिंग व्यवस्था नैसर्गिकरित्या पुढारलेली आहे. असे असतानाही शाळा-महाविद्यालयांना दीर्घ काळाच्या टाळेबंदीनंतर मोकळीक देण्याचा निर्णय घेतला असतानाही कोचिंग क्लासेसबाबत शासनाकडून शंका व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणांकात महाराष्ट्र माघारण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सचे शासनाकडे साकडे
राज्यातील कोचिंग क्लासेसच्या संघटनेने राज्यभरातील महापालिका आयुक्तांना कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. सध्या हे वर्ग ऑनलाईन स्वरूपात सुरू आहेत. मात्र, अनेक अडचणी असल्याने क्लासेस फिजिकली सुरू करण्याची परवानगी मागितली जात आहे. त्याअनुषंगाने नागपुरातही असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्सने नागपूर महानगरपालिका आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे साकडे घातले आहे.
* विद्यार्थी १२व्या वर्गात असतानाच अनेक प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात. कोचिंग क्लासेसमुळेच त्यांना अतिरिक्त परिश्रम घेणे शक्य होते. अशा स्थितीत कोचिंग क्लासेसला दुय्यम समजने, धोक्याचे आहे. शासनाने आमची नाही तर किमान विद्यार्थ्यांचा तरी विचार करावा. जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेच्या या युगात मागे पडणार नाहीत.
- रजनीकांत बोंद्रे, अध्यक्ष - असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट्स
* नागपुरात कोचिंग क्लासेस - ८००
* विद्यार्थीसंख्या - प्रतिकाेचिंग क्लास सरासरी १००
* कर्मचाऱ्यांची संख्या - प्रतिक कोचिंग क्लास सरासरी १५
* राज्यात कोचिंग क्लासेस - दीड ते दोन लाख
* केवळ १२वीच्या विद्यार्थ्यांची संख्या - १४ लाख (स्टेट बोर्ड)
* केवळ कर्मचाऱ्यांची संख्या - ३० लाख
* कोचिंग क्लासेसला बसलेला फटका
गेल्या नऊ महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद पडले आहेत. जागेचे भाडे, वीज बिल, पाणी बिल, टॅक्स आदींमध्ये कुठलीही सवलत मिळालेली नाही. त्यातच अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील ३० लाखावर प्रत्यक्ष रोजगारासह कोचिंग क्लासेसवर निर्भर असणारे अन्य रोजगारही डबघाईस आले आहेत. त्यामुळे, अनेकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी कोचिंग क्लासेसला शासनाने परवानगी देण्याची मागणी असोसिएशनतर्फे केली जात आहे.