विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांचीच; पोलीस आयुक्त अमितेश कुमार
By सुमेध वाघमार | Published: July 14, 2023 06:57 PM2023-07-14T18:57:49+5:302023-07-14T18:58:19+5:30
Nagpur News विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.
सुमेध वाघमारे
नागपूर : घरातून शाळेसाठी निघणारे आणि शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी ही शाळेची आहे. त्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.
वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये शुक्रवारी शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वाहतूक पोलीस विभागाच्या उपायुक्त चेतना तिडके, ग्रामीण पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) रवींद्र काटोलकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येत विविध शाळांतील मुख्यध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय आहे. अनेक शाळांच्या परिसरामध्ये पार्किंगचा अभाव असल्याने स्कूल बस चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करतात. रस्ता ओलांडताना तो सुरक्षितपणे ओलांडावा यासाठी शिक्षकांनी मुलांना रस्ता सुरक्षिततेचे ज्ञान देणेही आवश्यक आहे. मुलांना शाळेमध्ये सोडणाऱ्या वाहनांची स्थिती तपासून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे, याकडे फक्त पोलीस विभागाने लक्ष देऊन चालणार नाही तर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी जागृत असणे गरजेचे आहे.