३१ मार्चपर्यंत नागपुरातील शाळा, महाविद्यालये, मॉल बंद : मनपा आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 09:29 PM2020-03-14T21:29:51+5:302020-03-14T21:31:01+5:30
महापालिका हद्दीतील अंगणवाड्या, बालवाड्या, सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा व नाट्यगृहे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्च २०२० पासून लागू करून त्यातील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. या आदेशाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका हद्दीतील अंगणवाड्या, बालवाड्या, सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा व नाट्यगृहे ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी काढले.
तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत अशा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास ती रद्द करण्यात आल्याचे या आदेशात नमूद केले आहे.
१० वी व १२ वीच्या परीक्षात बदल नाही
शासन आदेशानुसार, विहित वेळापत्रकानुसारच १० वी व १२ वी आणि महाविद्यालयांच्या परीक्षा घेण्यात येतील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, याबाबत आवश्यक ती खबरदारी व दक्षतासंबंधित संस्था प्रमुखांनी घ्यावी, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी काढले आहेत.