२७ जूनला वाजणार विदर्भातील शाळांची घंटा; राज्य सरकारचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 01:39 PM2022-06-10T13:39:59+5:302022-06-10T13:46:14+5:30
विदर्भातील तापमान विचारात घेऊन उशिरा शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले.
नागपूर : २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विदर्भातीलशाळा जूनचा चाैथा साेमवार म्हणजे २७ जून राेजी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दुसरा साेमवार म्हणजे १३ जून राेजी शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भातील तापमान विचारात घेऊन उशिरा शाळा सुरू करण्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी करण्यात आले.
मागील दाेन वर्षांपासून काेराेनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दाेन वर्षांपासून नियमित शाळा हाेऊ शकल्या नाहीत. यावेळीही राज्यात चाैथ्या लाटेचा प्रकाेप वाढेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सध्या प्रादुर्भाव कमी असल्याने शाळा सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १३ व १४ जून राेजी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून स्वच्छता, शाळेचे साैंदर्यीकरण व मूलभूत सुविधांबाबत उपाययाेजना करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भातील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ जूनपासून शाळेत उपस्थित हाेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काेराेनाबाबत खबरदारी
सर्व शाळांना काेराेनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीच्या वेळी काेविड-१९ प्रादुर्भाव तसेच आराेग्यविषयक बाबींचे उद्बाेधन करण्याच्या सूचना आहेत. विदर्भात २४ जून, तर उर्वरित महाराष्ट्रात १३ व १४ जून राेजी प्रबाेधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शासन, आराेग्य विभाग आणि स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळाेवेळी आलेल्या सूचनांचे काटेकाेर पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.