नागपूर शहरातील शाळा १० डिसेंबरनंतर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 08:17 PM2021-11-30T20:17:29+5:302021-11-30T20:19:05+5:30
Nagpur News नागपूर शहरात मनपा आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेऊ असे स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीणमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नागपूर : राज्य शासनाने १ डिसेंबरपासून शहरातील १ ते ७ व ग्रामीण भागातील १ ते ४ चे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली. पण, कोरोनाचा ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा जगातील काही देशांमध्ये धोका वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे नागपूर शहरात मनपा आयुक्तांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेऊ असे स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीणमध्ये शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये सुरुवातीला ८ ते १२ वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ५ ते ७ वर्ग सुरू झाले. आता शासनाने १ ते ४ चे वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, शहरी भागात व महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या ८ ते १२ वर्गाच्याच शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या. अजूनही १ ते ७ वर्गाच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाही. सोमवारी संपूर्ण शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडे शाळा सुरू करण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले.
महापालिका आयुक्तांनी शाळा सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता वर्ग १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबर पर्यंत सुरु होणार नाही. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामीण भागातील १ ते ४ च्या शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली.
- शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात मंजुरी मिळाली नाही. पण, ग्रामीण भागातील वर्ग १ ते ४ च्या शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी शाळांकडून करून घेण्यात येईल.
-चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.