नागपुरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच;  १० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 09:11 PM2020-12-09T21:11:53+5:302020-12-09T21:12:19+5:30

Nagpur news school कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ३ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच राहणार असल्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी जारी केले.

Schools in Nagpur closed till January 3; There is no change in the schedule of 10th and 12th supplementary examinations | नागपुरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच;  १० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही

नागपुरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच;  १० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही

Next
ठळक मुद्देराधाकृष्णन बी. यांचे आदेश 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ३ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच राहणार असल्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी जारी केले. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याकरिता शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरूच राहतील, असेही आदेशात आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मागील आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा १३ डिसेंबर २०२० रोजी सुरू करण्याचा निर्णय मनपातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोविडची स्थिती आणि संभाव्य धोका लक्षात घेता हा निर्णय बदलून ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा बंदच ठेवण्याचे नवीन आदेश आयुक्तांनी निर्गमित केले आहेत.

आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई

- आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात महापालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांनी समन्वयन आणि संनियंत्रण करावयाचे आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही

- मनपा क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी नियंत्रणात आहे. मात्र जागतिक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता धोका टाळता येऊ शकत नाही. जगातील अनेक देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. भारतामध्ये दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोविड प्रादुर्भावाची स्थिती पाहता महाराष्ट्रातही तशी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या दिवाळीनंतर नागपूर शहरामध्येही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Web Title: Schools in Nagpur closed till January 3; There is no change in the schedule of 10th and 12th supplementary examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा