ग्रामीण भागातील शाळा ऑफलाईन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:59+5:302021-07-16T04:06:59+5:30
नागपूर. कोरोनामुक्त ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिल्यानंतर आज गुरुवारपासून शाळा ...
नागपूर. कोरोनामुक्त ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिल्यानंतर आज गुरुवारपासून शाळा पुन्हा गजबजल्या. कोरोना निर्बंधाचे पालन करून अटी शर्तीच्या आधारावर शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातही शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ९२ शाळा सुरू झाल्या असून त्यात १८३० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सर्वाधिक १४ शाळा काटोल तालुक्यात सुरू झाल्या तर सावनेर तालुक्यात एकही शाळा सुरू झाली नाही. शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने सर्वेक्षण करून ८१ टक्के पालकांची शाळा सुरू करण्याची संमती असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे शाळा सुरू होणार निश्चित मानले जात होते. मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक होते.
एकूण ९२ शाळा सुरू
जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर आठवी ते बारावीचे वर्ग भरविणाऱ्या ७५४ शाळा आहेत, त्यापैकी ६९ ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली होती. यामुळे जिल्ह्यातील ९२ शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी ३७८ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. नागपूर ग्रामीण तालुक्यात काटोल पाठोपाठ १३ शाळा, रामटेकमध्ये ११, नरखेड १०, उमरेड ९, हिंगणा ७, मौदा, भिवापूर व कुही मध्ये ६, कळमेश्वर ५, पारशिवनी व कामठी अनुक्रमे ३ व २ शाळा सुरू झाल्या.
सोशल डिस्टंन्सिंगचे पालन
शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करून एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, मास्कचा वापर यासह इतर नियमांचे पालन करून शाळा भरविण्यात आल्या आहेत.