आजपासून नागपुरातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 10:09 AM2021-12-16T10:09:08+5:302021-12-16T10:17:36+5:30
कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू आजपासून करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी आदेश जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा आज गुरुवारपासून उघडणार आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले.
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास आयुक्तांनी १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन यासंबंधीचे नवीन आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन या वर्गातील शाळा सुरू करण्याला स्थगिती दिली होती. आयुक्तांनी हा निर्णय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार घेतला होता. सुधारित आदेशात
शाळा सुरू करण्याला परवानगी देताना कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग आधीच सुरू आहेत.
शाळा सुरू करताना दिलेले निर्देश
-शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.
-लसीकरणासाठी मुख्याध्यापक यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, यांनी मनपाशी संपर्क साधून मोहीम स्वरूपात सर्वसंबंधितांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे.
-गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
-कोविड संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे.
-जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रात घ्याव्यात.
-एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, दोन बाकामध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.
-मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात साबणाने धुवावेत.
-शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवावे.
-विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.
-शाळा व परिसरात स्वच्छता ठेवावी.