नागपुरात शाळा झाल्या सुरू, विद्यार्थ्यांना मात्र सुटी, शिक्षकांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 09:34 PM2020-06-26T21:34:58+5:302020-06-26T21:37:18+5:30
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.
कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत राज्यातील सर्व शाळांना १६ मार्च पासून सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पुढे या सर्व शाळा सत्र संपतपर्यंत बंदच होत्या. नवीन शैक्षणिक सत्रात शाळा कधी व कशा सुरू करायच्या याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून १५ जून रोजी एक परिपत्रक निर्गमित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ९, १० आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, ६ ते ८ चे वर्ग १ आॅगस्ट, तिसरी ते पाचवीचे वर्ग १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावे. तर वर्ग १ व २ शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात यावे. कन्टेन्मेंट एरियामधील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे सुचविले होते. पण शिक्षकांनी उपस्थित रहावे किंवा नाही, याबाबत स्पष्ट केले नव्हते. मात्र स्थानिक प्रशासनाने पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीसुद्धा घेण्यास सांगितले होते. शिक्षकांनी शाळेत जातांना आरोग्याची तपासणी सुद्धा करवून घ्यायची होती. काही शाळेत याचे पालन झाले तर काही शाळेत याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील कन्टेन्मेंट एरिया सोडून सर्वच शाळा सुरू झाल्या. शिक्षण विभागाकडे शाळेच्या पहिल्या दिवशीचा १२३५ शाळांनी अहवाल पाठविला. दरम्यान कमी पटसंख्येच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले.
आरोग्य तपासणी न करताच शिक्षक शाळेत
बाहेरगावाहून येणाºया शिक्षकांनी वैद्यकीय तपासणीची प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आदेश होते. त्यासाठी काही शिक्षकांनी सकाळपासून आरोग्य केंद्रामध्ये गर्दी केली होती. काही शिक्षक शाळेत पोहचल्यानंतर, आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले. बहुतांश शिक्षक आरोग्य तपासणी न करताच शाळेत पोहचले.
वेलतूर ग्रा.पं.ने दिला इशारा
कुही पं.स. अंतर्गत येणाऱ्या वेलतूर ग्रा.पं.ने जि.प. उच्च प्रा. शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठवून शिक्षकांना मुख्यालयीच राहण्याची स्पष्ट ताकीद दिली. अन्यथा मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करून गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले. पचखेडी ग्रा.पं.ने शिक्षकांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात ठेवून, त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुम शोधून देणार असा निर्णय घेतला.
मुंबई, ठाण्यातील शिक्षकांना दिलासा आम्हाला का नाही?
शालेय शिक्षण विभागाने २४ जून रोजी परिपत्रक काढून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथील शाळेच्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार व ५५ वर्षावरील शिक्षकांना शाळेत न बोलाविण्याच्या सूचना केल्या. असा दिलासा इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही द्यावा, अशीही मागणी शिक्षकांनी केली.