शाळा सुरू केली, सुविधा कोण देणार? मनपाला नाही गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:54 PM2019-07-04T22:54:50+5:302019-07-04T22:57:25+5:30

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे.

Schools started, who will provide facilities? No seriousness to NMC | शाळा सुरू केली, सुविधा कोण देणार? मनपाला नाही गांभीर्य

शाळा सुरू केली, सुविधा कोण देणार? मनपाला नाही गांभीर्य

Next
ठळक मुद्देसंतप्त पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने बंद पडलेल्या शाळा सुरू तर केल्या, मात्र विद्यार्थ्यांसाठी सोईसुविधांबाबत पालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. बाबुळबनच्या मराठी प्राथमिक शाळेबाबतही हीच स्थिती दिसून येत आहे. ही बंद असलेली शाळा मनपाने सुरू केली व ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला. मात्र विद्यार्थ्यांना विदारक स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. आठ दिवस लोटूनही सोईसुविधांबाबत प्रशासनाने गंभीरता दाखविली नसल्याने पालकांमध्ये रोष पसरला आहे. 


आपल्या मुलांना अतिशय वाईट अवस्थेत दिवस घालवावा लागत असल्याने, बहुतेक पालकांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी भेट घेउन संतप्त भावना व्यक्त केल्या. २६ जूनपासून सर्वत्र नियमित शाळा सुरू झाल्या आहेत. पटसंख्येची कारणे देत बाबुळबनची शाळा बंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी पालकांनी मुलांना या शाळेत प्रवेश देण्याची तयारी दाखविल्यानंतर ही शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार ३२ मुलांचे प्रवेश झाले आहेत. दोन शिक्षक या शाळेत सेवारत झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा तरी पुरवाव्या याची भ्रांत मनपा प्रशासनाला राहिली नाही.
पालकांच्या तक्रारीनुसार शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही, डेस्कबेंच नसल्याने मुलांना सतरंजीवरच बसावे लागते, शिक्षकांना बसण्यासाठीही येथे खुर्च्या-टेबल नाहीत. शाळेच्या भिंती जुनाट व भकास आहेत, त्यावर रंगरंगोटी करून शाळा बोलकी होईल व विद्यार्थ्यांना शिकण्यास आनंद मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची तसदी मनपाने घेतली नाही. साफसफाईसाठी सफाई कामगार नाही किंवा चपराशीही नाही. मुलांसाठी पाणी भरून ठेवावे म्हणून कुठलीही व्यवस्था नाही. मुलांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळाल्याची माहिती आहे, मात्र गणवेश अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शाळेत मोटरपंप किंवा ओसीडब्ल्यूकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शालेय साहित्य ठेवण्यासाठी लोखंडी कपाट उपलब्ध करावे, शाळेची घंटी, नोंदणी रजिस्टर, वह्या, पुस्तक पुरविणे, पटांगणात खेळणी बसविणे, शालेय पोषण आहाराची व्यवस्था करणे, महिला चपराशी व सफाई कामगाराची नियुक्ती करणे आदी मागण्यांचे निवेदन पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनातील मागण्या बघता साध्या साध्या सुविधाही उपलब्ध करण्याची गरज मनपाला वाटली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय मनपाकडून सहज घेतला जातो. पण वाईट परिस्थिती असताना कोण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत पाठवेल, याचा विचार मात्र केला जात नाही.
शाळेसमोर चिखल, अतिक्रमणही
बाबुळबनच्या शाळेला दोन एकरच्या परिसरात प्रशस्त असे पटांगण आहे. आठ वर्गखोल्या असलेली प्रशस्त इमारतही आहे. मात्र त्याची दुरावस्था झाली आहे. पटांगणात धार्मिक स्थळांचे बांधकाम झाले असून काही भागात अतिक्रमणही झाले आहे. रात्री व दिवसाही असामाजिक तत्त्वांचा वावर येथे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या. पावसाळ््याचे दिवस असल्याने शाळेच्या पटांगणात सर्वत्र चिखल साचलेला आहे आणि या चिखलातूनच मुलांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ही अवस्था होते, याची पूर्वकल्पना कुणालाही येईल. मनपाला मात्र याबाबत जाग आली नाही.
दुर्बल समाज विकास संस्थेचे प्रयत्न
महापालिकेच्या मराठी शाळा टिकाव्या म्हणून अ. भा. दुर्बल समाज विकास संसाधन या संस्थेमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या याचिकेवरच न्यायालयाने बंद शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांना मनपाच्या शाळेत मुलांना टाकण्यास प्रेरित केले व बाबुळबनच्या शाळेत ३२ प्रवेश मिळवून दिले. मात्र शाळा सुरू होऊच नये, अशा मानसिकतेत असलेल्या मनपा प्रशासनाकडून त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे.

Web Title: Schools started, who will provide facilities? No seriousness to NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.