मनपाच्या हद्दीतील शाळा होणार ८ फेब्रुवारीपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:48+5:302021-01-25T04:08:48+5:30
नागपूर : वर्ग ९ ते १२वीच्या शाळा यशस्वी सुरू झाल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या २७ जानेवारीपासून वर्ग ५ ...
नागपूर : वर्ग ९ ते १२वीच्या शाळा यशस्वी सुरू झाल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८च्या शाळा सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले. नागपूर जिल्ह्यातील शाळांनी त्यासाठी तयारीही सुरू केली. पण, महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या शाळांना ८ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
यापूर्वीही जिल्ह्यात ९ ते १२च्या शाळा १४ डिसेंबर रोजी सुरू झाल्या. पण, महापालिका आयुक्तांनी मनपाच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू केल्या. ५ ते ८ वर्गाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी मनपा क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. त्या आदेशात त्यांनी शालेय शिक्षण विभागाने १० नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे. शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर आदींची उपलब्धता असल्याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घेण्यास सांगितले आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. वर्गखोली व स्टाफरुममधील बैठक व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. सोबतच एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. पालकांच्या लेखी सहमतीवर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनांचे किमान २ वेळा निर्जंतुकीकरण करण्याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन त्याचा अहवाल महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्तांना सादर करायचा आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीला सुरू करण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सर्व गटविकास अधिकारी व मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. शाळेत येण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे निर्देश दिले आहे. त्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय शासनाने स्वच्छता व सुरक्षाविषयक दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.