आकाशाला रंग निळा कसा, सांगा परावर्तन म्हणजे काय?, विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या आधारे विज्ञानाचे धडे
By निशांत वानखेडे | Published: October 19, 2023 05:31 PM2023-10-19T17:31:25+5:302023-10-19T17:34:35+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जागली विज्ञानाची गोडी : नागपूर विद्यापीठाचा आउटरिच उपक्रम
नागपूर : आकाशाचा रंग निळा का आहे, आपल्या सभाेवताल रंग कसे दिसतात, रंग विखुरणे, परावर्तन, अपवर्तन, मृगजळ का दिसते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे थेट विज्ञानाच्या प्रात्याक्षिकामधून मिळाल्याने गडचिराेलीच्या आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचे कुतूहल जागले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया नागपूर चाप्टर आणि आदिवासी विकास विभाग नागपूर विभाग (गडचिरोली) यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून आउटरिच उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी आउटरीच कार्यक्रम हाेता. नागपूर विद्यापीठाचा भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान विभागाचे याेगदान महत्त्वाचे हाेते. शासकीय आदिवासी आश्रम शाळा गडचिरोली आणि आदिवासी कन्या आश्रम शाळा सोडू (गडचिरोली) येथे कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेल्या वैज्ञानिक मॉडेलच्या आधारे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
विद्यार्थ्यांना विज्ञानाप्रती अधिक उत्सुक आणि जागरूक बनवणे. रोबोट: स्वायत्त आणि रिमोट कंट्रोल, वारा वेग मीटर, आयओटी आधारित घराची सुरक्षा, पंखे, दिवे, पथदिवे यासारख्या घरगुती उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आधी विविध मॉडेल्सच्या आधारे विज्ञानाची माहिती या उपक्रमातून देण्यात आली. आश्रमशाळेच्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. वैज्ञानिक मॉडेल्सच्या आधारे खास डिझाइन केलेल्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यापीठाच्या आयक्युएससी संचालक डॉ. स्मिता आचार्य आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सतीश शर्मा यांनी वैज्ञानिक मार्गदर्शन केले. एनएएसआय नागपूर चॅप्टर अध्यक्ष डॉ. एन. एस. गजभिये यांनी संचालन केले.