प्रात्यक्षिकांतूनच विज्ञानाचे शिक्षण हवे : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:36 PM2019-11-27T23:36:31+5:302019-11-27T23:38:21+5:30
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान पोहोचविले गेले पाहिजे. यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले पाहिजे. या मेळाव्याला व्यापक रूप देण्यासंदर्भात पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काळाप्रमाणे विज्ञानामध्येदेखील बरेच बदल होत आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति रुची वाढविण्याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान पोहोचविले गेले पाहिजे. यासाठी अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविले गेले पाहिजे. या मेळाव्याला व्यापक रूप देण्यासंदर्भात पावले उचलण्याची वेळ आली आहे, असे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले. नागपूर महानगरपालिका व ‘एआरटीबीएसई’ ( असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याचे बुधवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रभाषा भवन परिसरात आयोजित या कार्यक्रमाला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, ‘एआरटीबीएसई’चे सचिव सुरेश अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञानाच्या जवळ येत आहेत. या मेळाव्याला आणखी व्यापक स्वरूप यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावा. यातून मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आणखी चांगल्या संधी मिळतील, असे प्रतिपादन संदीप जोशी यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रयोगांचे निरीक्षण केले. याप्रसंगी नगरसेवक सुनील अग्रवाल, संजय बंगाले, उज्ज्वला शर्मा, रूपा राय, सुनील हिरणवार, राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, कुसुम चाफलेकर, शाळा निरीक्षक संजय दिघोरे, प्राचार्य संध्या मेडपल्लीवार, सीनियर सायन्स कम्युनिकेटर (कोलकाता) कृष्नेन्दु चक्रवर्ती, राजाराम शुक्ला, ओमप्रकाश मिश्रा, मनपा मेळावा समन्वयक प्राचार्य राजेंद्र पुसेकर उपस्थित होते.
शंभराहून अधिक प्रयोग
मेळाव्यात असोसिएशनच्या तज्ज्ञांद्वारे तयार करण्यात आलेले शंभर प्रयोग ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शनातील प्रयोगासाठी मनपा शाळांतील दोनशे विद्यार्थ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मेळाव्यात मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपची व्यवस्था विशेषत्वाने करण्यात आली आहे. या माध्यमातून सूक्ष्म जीवांबद्दल आणि अवकाशातील गतिविधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती घेता येऊ शकत आहे. यंदा वनस्पतीशास्त्र व अॅस्ट्रोनॉमीशी संबंधित प्रयोगदेखील आहेत.