महिलांच्या भागीदारीतून विज्ञानाचा आणखी विकास व्हावा - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 10:54 AM2023-01-03T10:54:03+5:302023-01-03T11:11:27+5:30
Indian Science Congress 2023 : नागपुरात १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचं आयोजन; पंतप्रधान मोदी यांचे ऑनलाइन मार्गदर्शन
नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला वर्च्युअली उपस्थिती नोंदवत शुभेच्छा दिल्या. भारत आधुनिक विज्ञानाची ऍडव्हान्स प्रयोगशाळा बनावा. महिलांच्या भागीदारीतून विज्ञानाचा आणखी विकास व्हावा. तरुणांना मंच प्रदान करणारे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क तयार व्हावे असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं.
परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. चिकित्सकता हाच विज्ञानाचा पाया असल्याचं मत व्यक्त करत ज्ञानातून जगाचं भलं करणं हेच संशोधकांचं कर्तव्य असल्यांची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताकडे तंत्रज्ञान आणि डेटाची मोठी शक्ती आहे. विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. स्टार्टअपच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. २०१५ पर्यंत १३० देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावर होता, परंतु २०२२ मध्ये ४० व्या स्थानावर झेप घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज विज्ञानक्षेत्रात सुरू असलेले कार्य पाहता येत्या २५ वर्षात भारत विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासह तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक उपयोग वाढविण्याचं ध्येय असल्याचं म्हणत आकांक्षांच्या विस्तारासाठी सामूहिक प्रयत्न महत्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ.जितेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्च्युअली उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, विज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद तब्बल ४८ वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले आहे. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण, अशी या आयोजनाची थीम आहे. मंगळवारपासून (दि. ३) सुरू झालेली ही परिषद ७ जानेवारीपर्यंत चालणार असून यात रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील.