वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून देशासाठी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:01 AM2017-08-15T01:01:53+5:302017-08-15T01:02:21+5:30
आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रा.खन्ना यांच्या कार्याकडून संशोधकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आजच्या काळात वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून नवनवीन कल्पनांवर काम केले पाहिजे व देशाला समोर नेले पाहिजे, असे मत शापूरजी पालूनजी इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल कंपनीचे ‘चीफ सस्टेनिबिलीटी आॅफिसर’ डॉ.विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशलन एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) सोमवारी प्रा.पी.खन्ना स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
‘नीरी’च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, ‘सीएसआयआर’च्या भरती व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश वटे, मुख्य वैज्ञानिक जे.एस.पांडे, प्रधान संशोधक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘द जर्नी इज द रिवॉर्ड’ या विषयावर डॉ.कुलकर्णी यांनी व्याख्यान दिले. प्रा.खन्ना हे दूरदृष्टी संशोधक होते. त्यांनी १९८४ साली संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण मोहिमेअंतर्गत ‘एन्व्हायर्नमेन्टल इम्पॅक्ट असेसमेन्ट’वर विशेष पुस्तिका तयार केली होती. प्रा.खन्ना यांच्या प्रयत्नांमुळे ‘नीरी’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली असे प्रतिपादन डॉ.वटे यांनी केले. डॉ.जे.एस.पांडे यांनी प्रास्ताविक केले. जया सब्जीवाले यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.