पुराच्या पाण्यात सातजण असलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, तिघांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 05:12 PM2022-07-12T17:12:59+5:302022-07-12T17:56:38+5:30
सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताच स्कॉर्पिओ पुराच्या प्रवाहात वाहून गेली.
सुनील चरपे
नागपूर : नुकतचं हिंगणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इसासनी परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यात एका नाल्यावरून सात जण गाडीसहित वाहून गेले.
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सततच्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूर परिस्थी आहे. अशातच, सावनेर तालुक्यातील नांदा ते छत्रपूर दरम्यानच्या नाल्यावरून पाणी वाहत असताना गाडी काढण्याच्या नादात ती गाडी ७ जणांसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना आज (दि. १२) दुपारी ३ च्या सुमारास घडली. त्या स्काॅर्पिओमध्ये तीन महिला, दाेन पुरुष, १० वर्षाचा मुलगा व वाहनचालक असे एकूण सात जण असल्याची तसेच यातील दाेन महिला व एका एक पुरुष अशा तिघांचे मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. ते सर्व जण मुरुड, ता. मुलताई, जिल्हा बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.
नांदागाेमुख, ता. सावनेर येथील सुरेश ढाेके यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न झाल्याने ते सर्व जण सुरेश ढाेके यांच्याकडे व्याही भाेजनासाठी आले हाेते. भाेजन आटाेपल्यानंतर पाऊस सुरू असताना ते स्काॅर्पिओने (एमएच-३१/सीपी-०२९९) मुलताईकडे जायला निघाले. दरम्यान, नांदागाेमुख-छत्रापूर मार्गावरील माेठ्या नाल्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. स्काॅर्पिओ काही दूर जाताच प्रवाहात अडकली आणि वाहून गेली. माहिती मिळताच केळवद पाेलिसांनी घटनास्थळ गाठून शाेधकार्य सुरू केले.