भंगार बसचा लिलाव रखडला : २२८ भंगार बसेस पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:13 PM2019-09-26T23:13:48+5:302019-09-26T23:14:18+5:30
भंगार बस विक्री केल्यास यातून अपेक्षित रकमेवर चर्चा झाली. परंतु उपसमितीला अध्यक्ष नसल्याने भंगार बसचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २२८ भंगार बसचा लिलाव करण्यासाठी वर्षभरापूर्वी परिवहन समितीची उपसमिती गठित करण्यात आली होती. समितीच्या अनेकदा बैठका झाल्या. भंगार बस विक्री केल्यास यातून अपेक्षित रकमेवर चर्चा झाली. परंतु उपसमितीला अध्यक्ष नसल्याने भंगार बसचा लिलाव करण्याची प्रक्रिया रखडली आहे.
भंगार बसचा लिलाव करण्यासाठी परिवहन समितीचे माजी सदस्य प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय उपसमिती गठित करण्यात आली होती. सदस्यात नितीन साठवणे व अर्चना पाठक यांचा समावेश होता. परंतु भिसीकर यांचा कालावधी संपल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. उपसमितीने भंगार बसच्या लिलाव प्रक्रि येसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊ न परिवहन विभागाला सूचना केल्या. परंतु लिलावाची प्रक्रिया पुढे सरकली नाही.
हिंगणा व टेका नाका येथे महापालिकेच्या भंगार बसेस उभ्या आहेत. या दोन्ही ठिकाणी बसेसच्या सभोवताल गवत व झुडपे वाढलेली आहेत. लिलावाला विलंब होत असल्याने बसचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. लिलाव प्रक्रिया पारदर्शी व्हावी, यासाठी यासाठी राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता घेण्याचे निर्देश उपसमितीने दिले होते. मात्र ही प्रक्रिया थंडावली आहे.
बसचे बाजारमूल्य ठरविण्याला विलंब
भंगार बसेस लिलावात काढण्याआधी त्यांची परिवहन नोंदणी रद्द करणे आवश्यक होते. त्यानुसार नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात आली. परंतु अजूनही काही बसेसची नोंदणी रद्द करण्यात आलेली नाही. नोंदणी रद्द के ल्यानंतर बसचे आजचे बाजारमूल््य काढून लिलाव करावा लागणार आहे. यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या. उपसमितीने वेळोवेळी निर्देश दिले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही.
शौचालय वा व्यवसासाठी वापर नाही
बचत गटाच्या महिलांना भंगार बस व्यवसायासाठी उपलब्ध करण्याची संकल्पना पुढे आली होती. तसेच वर्दळीच्या भागात महिलांसाठी शौचालयासाठी या बसचा वापर करण्यावर विचार सुरू होता. अद्याप दोन्ही प्रस्ताव कागदावरच आहे. नियोजनाचा अभाव व इच्छाशक्ती नसल्याने मागील काही वर्षापासून भंगार बसेस वापराविना पडून आहे.