राज्यातील हजारो वाहनांवर स्क्रॅपचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:12 AM2020-02-22T11:12:20+5:302020-02-22T11:13:48+5:30
एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी विना नोंदणीची तीन हजारावर वाहने आहेत. राज्यात याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘बीएस-४’ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंत करण्याचे बंधन आहे. त्यानंतर विना नोंदणी आढळणाऱ्या वाहनांना भंगारात (स्क्रॅप) काढण्याचे निर्देश आहेत. परंतु ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लागल्यानंतरच वाहनाची नोंदणी होते. एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी विना नोंदणीची तीन हजारावर वाहने आहेत. राज्यात याची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे.
वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत कार्बन उत्सर्जनाबाबतचे ‘बीएस-४’चे मापदंड पूर्ण करू न शकणाºया वाहनांवर सर्वोच्च न्यायालयाने देशव्यापी बंदी घातली आहे. या मानांकनातील वाहनांचे उत्पादन बंद झाले आहे. परंतु वाहन व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने आजही अनेक विक्रेत्यांकडे ‘बीएस-४’ची वाहने पडून आहेत. या वाहनांवर १० हजारापर्यंतची सूट देण्याच्या जाहिरातीही झळकू लागल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आजही अनेक वाहन विक्रेत्यांनी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ ला गंभीरतेने घेतले नाही. यामुळे वाहनांना नंबर प्लेट लागण्यास उशीर होत आहे. नंबर प्लेट लागल्यावरच वाहनाची नोंदणी होते. याची दखल घेत आरटीओ कार्यालयांनी सर्व वाहन विक्रेत्यांना तातडीने नोंदणी करण्याचे पत्र दिले. सध्या नोंदणी न झालेली नागपूरसह राज्यात सुमारे २० हजारांवर वाहने असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२३ दिवसांत हजारो वाहनांची नोंदणी कशी?
३१ मार्च नोंदणीची शेवटची तारीख आहे. सुट्या वगळता नोंदणीसाठी २८ दिवसांचा कालावधी आहे. परंतु हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वाहनांना लागेपर्यंतच्या प्रक्रियेत पाच दिवसांचा वेळ जात असल्याने विक्रेत्यांकडे केवळ २३ दिवस आहेत.
एवढ्या कमी दिवसात हजारो ‘बीएस-४’ वाहनांवर नोंदणी होणार कशी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
एचएसआरपी फोटो काढल्यावरच नोंदणी
वाहन विक्रेत्याकडून विक्री झालेल्या वाहनाची मोटार वाहन निरीक्षक तपासणी करून संगणकावर नोंद करतो. विक्रेत्यांकडून ‘रोड टॅक्स’ भरला जातो. वाहनाच्या कागदावर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वाक्षरी करतो. लिपिक वाहनाला नंबर देतो. विक्रेता हा नंबर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) तयार करणाºया सेवापुरवठादाराकडे पाठवितो. प्लेट तयार होऊन आल्यावर वाहनाला लावली जाते. त्याचा फोटो काढून आरटीओच्या ‘वाहन’या संकेतस्थळावर टाकावा लागतो. त्यानंतरच नोंदणी होते. यात साधारण पाच दिवसांचा कालावधी जातो.