नागपूरच्या आयुध निर्माणीत 'स्क्रॅप' घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:13 PM2020-01-22T22:13:07+5:302020-01-22T22:23:07+5:30
अमरावती रोडवरील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये ‘स्क्रॅप’ (भंगार) घोटाळा उघडकीस आला आहे. आयुध निर्माणीमधून दिल्लीला जात असलेले तीन ट्रक पकडून ठराविक प्रमाणापेक्षा ३५ टन अधिक भंगार जप्त करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावती रोडवरील संरक्षण मंत्रालयाच्या आयुध निर्माणीमध्ये ‘स्क्रॅप’ (भंगार) घोटाळा उघडकीस आला आहे. आयुध निर्माणीमधून दिल्लीला जात असलेले तीन ट्रक पकडून ठराविक प्रमाणापेक्षा ३५ टन अधिक भंगार जप्त करण्यात आले. खडगांव रोडवर झालेल्या या कारवाईमुळे आयुध निर्माणीतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सैन्याशी संबंधित प्रकरण असल्याने पोलीसही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.
आयुध निर्माणीमध्ये देशाच्या सैन्यासाठी आवश्यक संरक्षण उत्पादने ( दारुगोळा ) तयार केला जातो. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप निघतो. निविदा काढून त्याची विक्री केली जाते. दिल्ली येथील शौर्या इनपेक्स कंपनीला स्क्रॅप खरेदीचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीचा मॅनेजर महेश तिवारी मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता आयुध निर्माणीतून तीन ट्रक स्क्रॅप घेऊन रवाना झाला. दरम्यान गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील गांगुर्डे आणि पीएसआय साजीद यांना ट्रकमध्ये संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हवालदार युवराज ढोले, इशांक आटे, शेख इमरान, आशीष बावनकर, संतोष शेंद्रे आणि संतोष उपाध्याय यांच्या मदतीने खडगाव रोडवर गजानन मंदिरजवळ तिन्ही ट्रक थांबवले. पोलिसांना पाहून चालक ट्रक सोडून फरार झाला. पोलिसांनी महेश तिवारीला पकडले. पोलिसांनी तिवारीला स्क्रॅपचे दस्तावेज मागितले. सूत्रानुसार दस्तावेजानुसार तिन्ही ट्रकांमध्ये १५, १६ आणि १७ टन स्क्रॅप असल्याचे उघडकीस आले. परंतु ट्रकची तपासणी केल्यावर यापेक्षा जास्त स्क्रॅप असल्याचा संशय आला. पोलिसांनी तिन्ही ट्रक वाडी येथील धर्मकाट्यावर आणले. असे सांगितले जाते की, धर्मकाट्यावर ३० टन स्क्रॅप अधिक असल्याचे उघडकीस आले. या अतिरिक्त स्क्रॅपची किमत जवळपास ७ लाख रूपये इतकी होती.
अतिरिक्त स्क्रॅपबाबत विचारपूस केली असता तिवारी उत्तर देऊ शकला नाही. यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी प्रकरण वाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. वाडी पालिसांनी रात्रीपासून प्रकरणाचा तपास सुरू केला. बुधवारी सकाळी याची पुन्हा तपासणी करण्यात आली. वजन केले असता ३५ टन स्क्रॅप अतिरिक्त असल्याचे समोर आले. वाडी पोलिसांनी या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी याची कुणालाही माहिती होऊ दिली नाही. काही विश्वासू अधिकाऱ्यांना आयुध निर्माणीच्या अधिकाऱ्यांशी विचारपूस करण्यास सांगितले.
सूत्रानुसार शौर्या इनपेक्स कंपनी अनेक वर्षांपासून आयुध निर्माणीतून स्क्रॅप खरेदी करत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप निघतो. याची हेराफेरी करून आयुध निर्माणीला चुना लावण्यात येत आहे. आयुध निर्माण ही संरक्षण मंत्रालयांतर्गत येणारी कंपनी आहे. येथील सुरक्षा व्यवस्था अतिशय तगडी आहे. या परिसरातील कुठलीही वस्तू येथून अवैधपणे बाहेर जाऊ शकत नाही. स्क्रॅपला ट्रकमध्ये चढवून रवाना करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली केले जाते. यानंतरही ३५ टन अतिरिक्त स्क्रॅपलोड केल्याची बाब कुणाच्याही लक्षात कशी आली नाही? हे आश्चर्यचकित आहे.
कंपनीचे संचालकही पोहोचले
मिळालेल्या माहितीनुसार शौर्या इनपेक्स कंपनीचे संचालक मंगळवारी रात्रीच नागपूरला पोहोचले होते. ते आपल्या स्तरावर प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु प्रकरण गंभीर असल्याने त्यांचे काही चालले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा वाडी पोलिसांना कसून चौकशीचे आदेश दिले आहेत. वाडी पोलीस सध्या कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. तपासानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
आयुध निर्माणीला पाठवले पत्र
या प्रकरणात वाडी पोलिसांनी आयुध निर्माणीला पत्र पाठवून ट्रकमध्ये अतिरिक्त स्क्रॅप लोड करण्याबाबत विचारणा केली आहे. आयुध निर्माणीला प्रकरणाची चौकशी सुरु केल्याची माहिती देत सहकार्य करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विचारपूस करून त्यांची जबाबदारी निश्चित करणार आहे. परंतु कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे यासर्व प्रकरणाची माहिती असणाऱ्यानेच गिट्टीखदान पोलिसांना याची माहिती दिली. आयुध निर्माणीने सुद्धा या प्रकरणाची आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली आहे.