नागपुरात जीवघेण्या ‘स्क्रब टायफस’चा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:00 AM2018-08-24T11:00:49+5:302018-08-24T11:03:12+5:30
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असून गेल्या २० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले आहेत.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असून गेल्या २० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे हा आजार होतो. या जीवाणूचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो. जिथे झाडेझुडपे आणि गवत वाढलेले असते, अशा ठिकाणी हे ‘चिगर माईट्स’ असतात. या रोगावर तत्काळ उपचार न घेणाऱ्या ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. ‘स्क्रब टायफस’ची पहिली नोंद १८९९ मध्ये जपानमध्ये घेण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी रशियामध्ये ३० लाख लोक या रोगामुळे दगावले होते. दुसºया महायुद्धाच्या वेळी हा आजार बर्मा आणि सिलोनच्या सैनिकांनासुद्धा झाल्याची नोंद आहे. स्क्रब टायफस हा मुख्यत: दक्षिण पश्चिम आशिया आणि दक्षिण अमेरिकी या देशात होतो. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात. पावसाळा सुरू झाला की या रोगाचे आगमन होते. काही ठिकाणी हिवाळ्यातसुद्धा याचा त्रास होतो. हा रोग अंदाजे १० लाख लोकांना होता, वेळेत औषधोपचार मिळाला नाही तरमृत्यू ओढावतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये आॅगस्ट महिन्याच्या आतापर्यंत १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यातील दोन रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
३ ते २२ आॅगस्टदरम्यान ‘स्क्रब टायफस’ रुग्णांची संख्या वाढली. आतापर्यंत १३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून यातील ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित आठ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण हे गंभीर होऊन येत आहे.
-डॉ. वाय.व्ही. बन्सोड
विभाग प्रमुख,
औषधवैद्यकशास्त्र विभाग
४० टक्के लोकांमध्ये लक्षणेच दिसून येत नाही
या आजारामध्ये डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे आणि काही रुग्णांमध्ये किडा चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे. परंतु ४०टक्के लोकांमध्ये याची लक्षणे दिसून येत नाही. रक्ताची चाचणी केल्यानंतरच रोगाचे निदान होते.
काही रुग्णांना किडनी, तर काहींना फुफ्फुसाचा त्रास
आसाममधील एका संशोधनामुळे ५०० हून जास्त मेंदूज्वराच्या रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण स्क्रब टायफसचे होते. काही रुग्णांमध्ये किडनीचा त्रास होतो, तर ५०टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा त्रास आणि न्यूमोनिया होतो. काही रुग्णांना कावीळ होतो, तर काहींना श्वासाचा त्राससुद्धा होतो.
हे करा
- दाट झाडाझुडपात जाऊ नका.
- पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला.
- घरात आणि बाहेर स्वच्छता पाळा.
- डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- काही रुग्णांमध्ये कीडा चावल्यास चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो.
स्क्रब टायफसवर प्रतिबंधक लस नाही
या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. पण साथीच्या वेळी डॉक्टरकडे जाणे आणि वेळेत औषधोपचार, अॅन्टीबायोटिक्स घेतल्याने या रोगापासून बचाव होतो. लोकांचे जनजागरण, उंदरावर नियंत्रण आणि लवकर निदान झाले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो.