पेंचचा कालवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:32 AM2017-10-26T01:32:59+5:302017-10-26T01:33:20+5:30
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. हा कालवा जलाशयापासून पारशिवनी, रामटेक, मौदामार्गे भंडारा जिल्ह्यात जातो. मागील ३७ वर्षांत या कालव्याची एकदाही प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय वाढला असून, दुसरीकडे शेतकºयांना ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातच निधीअभावी कालवा दुरुस्तीची कामे रखडल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागातील अधिकारी देतात.
पेंच जलाशय हे नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले होते. या जलाशयातील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी तसेच कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला विजेच्या उत्पादनासाठी पाणी दिले जाते; शिवाय पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठीही पाणी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी डावा आणि उजवा अशा दोन मुख्य कालव्यांची १९८० मध्ये निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही.
या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अधूनमधून निधी मंजूर केला. परंतु, भ्रष्टाचारामुळे या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी, मुख्य कालव्यांच्या भिंतीवर ठिकठिकाणी झुडपे वाढली असून, त्यांच्या मुळांमुळे भिंतीला तडा जाऊ लागल्या. एवढेच नव्हे तर खेकड्यांनी भिंती पोखरल्याने कालव्यातील पाणी झिरपण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रमाणही वाढत गेले.
अभियंत्यांनी केली पाहणी
पेंच लाभक्षेत्राचे मुख्य अभियंता आर. एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, उपविभागीय अभियंता आर. एम. धोटे यांनी या कालव्याची व वितरिकांची नवरगाव जंक्शन, रामटेक, निमखेडा, खात, शहापूर, सातोना, रेवराळ, नेरी, मौदा, भंडारा या भागात पाहणी केली. कालव्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी मिळाले की नाही, याचीही या अभियंत्यांनी चौकशी केली. त्यांना प्रत्येक ठिकाणी कालव्याची दुर्दशा दिसून आली. परंतु, दुरुस्तीबाबत विचारणा केल्यावर या अभियंत्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. ही पाहणी कालव्याच्या दुरुस्तीसाठी नसून, शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.