मुलांभोवती स्क्रब टायफसचा विळखा : रुग्णांची संख्या गेली ५२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:54 AM2018-09-05T00:54:52+5:302018-09-05T00:56:06+5:30
टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले. विशेष म्हणजे, आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.
‘चिगर माईट्स’ किटाणुंमुळे पसरणारा ताप म्हणजे ‘स्क्रब टायफस’ सध्यातरी नियंत्रणात नसल्याचे चित्र आहे. साधारणपणे डोकेदुखी, अस्वस्थता आणि भूक कमी लागण्यापासून सुरुवात होणाऱ्या या रोगाचे वेळीच निदान व उपचार न झाल्याने आतापर्यंत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत ‘पॉझिटिव्ह’ आलेल्या आठ नव्या रुग्णांत अमरावती येथील १० वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. या रुग्णावर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर सोमवारी निदान झालेल्या पाऊणे तीन वर्षीय चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एकट्या मेयोमधील चार रुग्ण पॉझिटिव्ह
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) स्क्रब टायफस संशयित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी उपलब्ध झाला. यातील तब्बल चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर औषधोपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आठ रुग्णांमध्ये चार रुग्ण नागपूर ग्रामीणमधील
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या स्क्रब टायफसच्या आठ रुग्णांमध्ये चार रुग्ण हे नागपूर ग्रामीणमधील आहे. यात कोराडी येथील ५४ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर महादुला कोराडी येथील २० वर्षीय पुरुष, सालईखुर्द येथील ५५ वर्षीय महिला व मौदा तारसा येथील ६० वर्षीय महिलेचा समोवश आहे. या शिवाय, मध्य प्रदेशातील ५५ वर्षीय पुरुष, गोंदिया येथील २० वर्षीय महिला, भंडारा येथील ४५ वर्षीय पुरुष व अमरावती येथील १० वर्षीय मुलाचा समावेश असून यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.
ताप असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा
डोकेदुखी, थंडी वाजून तीव्र ताप येणे, मळमळणे, सुस्ती येणे, शरीरात कंप सुटणे, लसिक गाठीमध्ये सूज येणे, सांधेदुखी, कोरडा खोकला, न्युमोनियासदृश आजार, ‘चिगर’ कीटक चावल्याने खाज व अंगावर चट्टे येणे आणि चिगरदंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खपली येणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. लवकर उपचार घेतल्यास हा रोग पूर्णत: बरा होतो. यामुळे साधा ताप असलातरी अंगावर काढू नका, डॉक्टरांना दाखवा. मुलांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
डॉ. दीप्ती जैन
प्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल.