स्क्रब टायफसने वृद्धाचा मृत्यू : बळी संख्या १५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 08:54 PM2018-09-07T20:54:10+5:302018-09-07T20:56:14+5:30
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुन्हा एका मृत्यूची नोंद झाल्याने ही संख्या १५वर गेली आहे. तर रुग्णांची संख्या ८८वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुन्हा एका मृत्यूची नोंद झाल्याने ही संख्या १५वर गेली आहे. तर रुग्णांची संख्या ८८वर पोहचली आहे.
मधुकर माहेपाल पुडके (७६) रा. केडीके कॉलेज परिसर, नंदनवन नागपूर असे मृताचे नाव आहे.
स्क्रब टायफसचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहे. या रुग्णांची संख्या २९ एवढी असून यातील २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर शहरात १३ रुग्णांची नोंद झाली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी या रोगाचा मृत्यू म्हणून नोंद झालेले मधुकर पुडके ४ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झाले. परंतु एक दिवसाच्या उपचारानंतर ५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
६३ रुग्ण भरती, १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर
आतापर्यंत आढळून आलल्या स्क्रब टायफसच्या ८८ रुग्णांमधून १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ रुग्ण अद्यापही मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित १५ रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे. यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तर १० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
१५ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
स्क्रब टायफसचे आतापर्यंत आढळून आलेल्या ८८ रुग्णांमध्ये १५ ते ४५ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांची संख्या ४७ एवढी आहे. उपलब्ध माहितीनुसार १ ते १४ वयोगटात ५ रुग्ण, १५ ते ३० वयोगटात २३ रुग्ण, ३१ ते ४५ वयोगटात २४ रुग्ण, ४६ ते ६० वयोगटात २६ रुग्ण, ६० वर्षांवरील वयोगटात १० रुग्णांचा समावेश आहे. यात ४४ महिला व ४४ पुरुष आहेत.