नागपूरच्या पॉश हनुमाननगरात स्क्रब टायफसचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:39 AM2018-09-14T00:39:32+5:302018-09-14T00:41:09+5:30
स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्क्रब टायफसच्या आवळत्या विळख्याने लोक दहशतीत आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण व शहरातील जुनाट वस्तीमध्ये आढळून येणारा हा आजार हनुमाननगरसारख्या पॉश वसाहतीमध्येही दिसून येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय, गुरुवारी पुन्हा चार रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या १०६ वर पोहचली आहे.
स्क्रब टायफस आजारावर सध्यातरी प्रतिबंधक लस नाही. यामुळे आजार टाळण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे महत्त्वाचे झाले आहे. या आजाराला कारणीभूत ठरलेला ‘चिगर माईट्स’ जीवाणूचा प्रादुर्भाव हा उंच गवतावर, दाट झाडीझुडूपात होतो. यामुळे तिथे जाणे टाळावे. उघड्यावर शौचास जाऊ नये, चारा, गवत गोळा करताना पूर्ण कपडे घालावे, झाडाझुडपात काम करून आल्यावर आपले कपडे गरम पाण्यात भिजवावे, लवकर निदान, लोकांची जनजागृती, उंदरांवर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो, अशी जनजागृती पत्रके आरोग्य विभागाकडून वितरित केली जात आहे. परंतु त्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी नागपूर शहरातील हनुमाननगर येथील ३६ वर्षीय तर कामठी येथील ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. सूत्रानुसार, या दोन्ही महिलेवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. तर गुरुवारी नागपूर ग्रामीणमधील काटोल व नरखेडसह अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एक-एक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्णांची संख्या १०६ तर बळींची संख्या १६ झाली आहे.