नागपुरात स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:46 PM2018-08-28T23:46:52+5:302018-08-28T23:48:40+5:30
‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील आहे.
झाडीझुडपे, गवतात आढळून येणाऱ्या ‘चिगर माईट्स’ या कीटकापासून माणसात संक्रमित होणाºया ‘स्क्रब टायफस’च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) झाल्याने खळबळ उडाली. वाढती रुग्णसंख्या व सहा रुग्णांच्या मृत्यूने आरोग्य विभागाला याची दखल घ्यावी लागली. सोमवारी आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मेडिकलनेही यात पुढाकार घेऊन सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेतच मंगळवारपासून ‘स्क्रब टायफस’ची तपासणी सुरू केली. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रयोगशाळेत ‘आयजीएम रॅपिड टेस्ट किट’ उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यास सांगितले जायचे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी मेडिकल प्रशासनाने या विभागाला ‘किट’ उपलब्ध करून दिली. त्यानुसार मंगळवारी तपासणीला सुरुवात झाली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ही चाचणी होत नसल्याने त्यांच्याकडील नऊ ‘स्क्रब टायफस’ संशयित रुग्णांचे नमुने मेडिकलला पाठविले. यात तिघे पॉझिटिव्ह आले, तर मेडिकलमधील चार संशयित रुग्णांचे नमुने तपासले असता एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २२ झाली आहे.
इंजेक्शनचा तुटवडा
स्क्रब टायफसची लक्षणे दिसताच देण्यात येणारे औषध ‘डॉक्सिक्लाईन’ गोळ्यांच्या व इंजेक्शनच्या स्वरूपात मेडिकल उपलब्ध नव्हते. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच सोमवारी आरोग्य विभागाने हजार गोळ्या उपलब्ध करून दिल्या. इंजेक्शन घेण्याची तयारी स्वत: मेडिकलने दाखविली. परंतु आठच इंजेक्शन उपलब्ध करून दिले. सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात ‘स्क्रब टायफस’चे तीन रुग्ण उपचार घेत आहेत. प्रत्येकाला रोज दोन इंजेक्शन द्यावी लागत असल्याने तुटवडा पडला आहे.