उंदरांमुळे पसरतोय स्क्रब टायफस : पशुवैद्यकीय तज्ज्ञाचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 09:23 PM2018-09-07T21:23:15+5:302018-09-07T21:26:31+5:30
या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व्यक्ती येत असल्याने या वर्षी ‘स्क्रब टायफस’ वाढला असावा, अशी शक्यता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी व डॉ. एस. डब्ल्यू. कोलते यांनी वर्तवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : या वर्षी विदर्भात मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, यामुळे जमिनीखालील उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, परिणामी बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या रक्तावर वाढत असलेले स्क्रब टायफसचे ‘चिगर माईट्स’ हे उंच गवतात, दाट झाडीत पसरत असल्याने आणि त्यांच्या संपर्कात व्यक्ती येत असल्याने या वर्षी ‘स्क्रब टायफस’ वाढला असावा, अशी शक्यता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप चौधरी व डॉ. एस. डब्ल्यू. कोलते यांनी वर्तवली आहे.
डॉ. चौधरी म्हणाले, दरवर्षी ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येतात परंतु यांची संख्या फार कमी राहत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. २०१२ मध्ये चर्चेला आलेला हा रोग २०१८ मध्ये का वाढला या बाबत सामूहिक संशोधन होणे आवश्यक आहे. ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरिएन्शिया सुतसुगामुशी’ नामक जीवाणूमुळे (बॅक्टेरिया) होतो. हे बॅक्टेरीया विशेषत: उंदरांच्या रक्तावर पोसले जातात. यामुळे या आजाराचे वाहक म्हणून उंदरांकडे पाहिले जाते.
डॉ. कोलते म्हणाले, स्क्रब टायफस हा साधारण आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दिसून यायचा. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पावसाचे पाणी जमिनीखाली असलेल्या उंदरांच्या बिळात शिरले. हे उंदीर बिळाबाहेर येऊन उंच गवतात, झाडांच्या मुळाखाली, घरात आले. त्यांच्या शरीरावर असलेले बॅक्टरीया म्हणजे ‘चिगर माईट्स’ ज्याचा आकार अतिशय सुक्ष्म ०.२ ते ०.४ मिलिमीटर एवढा असतो, जे सर्वसाधारण नजरेसही पडत नाही, असे हे जीवाणू एखादा व्यक्ती गवतात, झुडूपात गेल्यास त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. साधारण तीन दिवसानंतर ते खाली पडतात. त्या ठिकाणी व्रण दिसतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे. परंतु ४० टक्के लोकांमध्ये याची लक्षणे दिसून येतातच असे नाही. असे हे बाधित जीवाणू पुढे प्रौढ होऊन उंदरांच्या बिळामध्ये अंडी देतात आणि अशी त्यांची ‘सायकल’ सुरू असते.
‘चिगर माईट्स’ मिळविण्यासाठी प्रयत्न
डॉ. चौधरी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ‘चिगर माईट्स’ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. काही उंदरांना पकडून महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आणून तसा प्रयत्नही झाला, परंतु माईट्स आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे, एखाद्या घरात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आल्यावर त्याच्या बाजूचा घरात किंवा त्याच घरातील कुटुंबात रुग्ण आढळून आलेले नाही. यामुळे याच्यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे.