दोन वर्षाच्या चिमुकलीला स्क्रब टायफस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 07:50 PM2018-09-03T19:50:57+5:302018-09-03T19:57:41+5:30

‘स्क्रब टायफस’ हा आता मोठ्यापर्यंतच मर्यादित न राहता लहान मुलांमध्येही पसरत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दोन वर्षे नऊ महिन्याच्या चिमुकलीला या रोगाचे निदान झाले. सध्या या चिमुकलीवर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर, स्क्रब टायफसने पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बळीची संख्या १२ तर नागपूर विभागात रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.

Scrub Typhus to two-year-old girl | दोन वर्षाच्या चिमुकलीला स्क्रब टायफस

दोन वर्षाच्या चिमुकलीला स्क्रब टायफस

Next
ठळक मुद्देमृत्यूची संख्या १२ : नव्या चार रुग्णांची पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्क्रब टायफस’ हा आता मोठ्यापर्यंतच मर्यादित न राहता लहान मुलांमध्येही पसरत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दोन वर्षे नऊ महिन्याच्या चिमुकलीला या रोगाचे निदान झाले. सध्या या चिमुकलीवर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर, स्क्रब टायफसने पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बळीची संख्या १२ तर नागपूर विभागात रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.
२०१२ नंतर अचानक मोठ्या संख्येत समोर आलेल्या ‘स्क्रब टायफस’ला घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता हा रोग लहान मुलांमध्येही दिसून येऊ लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेली चिमुकली ही सावरगाव नरखेड येथील आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. शनिवारी तिला मेडिकलच्या बालरोग विभागात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले. आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला घेऊन बालारोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी ‘लोकमत’ला सांगितले, सध्या मुलीची प्रकृची स्थिर आहे. बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) उपचार घेत आहे. तिला न्युमोनियाही झाला आहे. तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
शनिवारी ‘स्क्रब टायफस’ने पुन्हा एका मृत्यूची नोंद झाली आहे. गणेश चिंतामणी पवार (६०) रा. कामठी असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, हा रुग्ण मेडिकलमध्ये आला तेव्हा प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्याच दिवशी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
मेडिकलमध्ये स्क्रब टायफसची तपासणी होऊ लागल्यापासून आतापर्यंत ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. यात १७ पुरुष व २१ महिलांचा समावेश आहे, तर मृतांमध्ये पाच पुरुष व सात महिला आहेत.

विभागात ४४ रुग्णांची नोंद
विदर्भासह, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या स्क्रब टायफस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वरून ४४ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये तारसा येथील ६० वर्षीय महिला, अर्जुनी मोरगाव गोंदिया येथील २० वर्षीय महिला, कामठी येथील ६० वर्षीय पुरुष व अमरावती येथील ३४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

स्क्रब टायफसची स्थिती

जिल्हा                           रुग्ण                    मृताची संख्या
नागपूर                          १४                        ०५
शहर                             ०३                        ०२
वर्धा                              ०२                        ००
गडचिरोली                    ०३                        ००
भंडारा                           ०२                       ०१
अकोला                         ०२                       ०१
अमरावती                      ०५                      ००
                         इतर राज्य
मध्य प्रदेश                    १२                       ०३
आंध्र प्रदेश                    ०१                      ००

Web Title: Scrub Typhus to two-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.