मूर्तिकार लागले कामाला, बाप्पा यंदा पावतील का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 09:03 AM2021-06-01T09:03:05+5:302021-06-01T09:04:32+5:30
Nagpur News येणाऱ्या गणोशोत्सवाच्या अनुषंगाने मूर्तिकार आपल्या कामाला लागले आहेत. मात्र, शासन निर्देशाची स्पष्टता नसल्याने यंदा बाप्पा पावतील का, असा प्रश्न पडला आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूर्तिकारितेचा व्यवसाय आता पूर्वीसारखा हंगामी राहिलेला नाही. वेगवेगळ्या अनुषंगाने मूर्तिकार वर्षभर आपली कामे करत असतात. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाला आणि पारंपरिक मूर्तिकारांच्या व्यवसायावर विरजण पडले. त्यातून हा वर्ग अजूनही सावरलेला नाही आणि कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने उरलेसुरले कंबरडेही मोडले आहे. अशास्थितीत येणाऱ्या गणोशोत्सवाच्या अनुषंगाने मूर्तिकार आपल्या कामाला लागले आहेत. मात्र, शासन निर्देशाची स्पष्टता नसल्याने यंदा बाप्पा पावतील का, असा प्रश्न पडला आहे.
यंदा सप्टेंबर महिन्यात श्रीगणेशोत्सव आहे. त्यापूर्वी कृष्णजन्माचा उत्सव असतो. त्या अनुषंगाने मूर्तिकारांच्या मूर्तिकलेला मार्च-एप्रिलपासून प्रारंभ होत असतो. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोना संक्रमणाने फेब्रुवारी-मार्चपासून थैमान घातले आणि पुन्हा लॉकडाऊन लागले. पहिल्या लाटेचा फटका आधीच बसलेल्या मूर्तिकारांना दुसऱ्या लॉकडाऊनने भयक्रांत करून सोडले आहे. मात्र, येणारा दिवस निघून जाईल आणि पुन्हा चांगले दिवस येतील, या अपेक्षेने मूर्तिकारांनी श्रीगणपती बाप्पाच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच कृष्ण कन्हैया, दुर्गा, सरस्वती आदींच्या मूर्तीची तयारीही सुरू झालेली आहे. केवळ शासकीय दिशानिर्देश अनुकूल असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात पारंपरिक मूर्तिकार - ६०० च्यावर
हंगामी मूर्तिकार - १५० च्या जवळपास
दरवर्षी होणारी श्रीगणेश मूर्तींची विक्री - ४ लाखाच्या जवळपास
शहरात तयार होणाऱ्या मूर्ती - साधारणत: अडीच लाख
बाहेरून येणाऱ्या मूर्ती - साधारणत: १ लाख
२०२० मध्ये झालेला तोटा - २५ टक्के विक्री झाली नाही
मूर्तीकरिता लागणारी माती येते कुठून?
मूर्तीसाठी लागणारी माती नागपूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असते. मात्र, सुबक मूर्तींसाठी विशिष्ट पद्धतीची माती तयार करावी लागते. आलेली माती भिजू टाकणे, ती गाळणे आणि पुन्हा कसणे आदी प्रक्रियेनंतर ती माती मूर्तीसाठी सिद्ध होत असते.
पीओपीची धास्ती
आधीच लॉकडाऊनमुळे पारंपरिक मूर्तिकारांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पीओपी मूर्तींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. मनपाने कितीही निर्बंध घातले असले तरी या मूर्ती शहरात प्रवेश करतातच. त्याचा फटका पारंपरिक मूर्तिकारांना बसतो आहे.
मूर्तिकारांनी श्रीगणपती मूर्तींची तयारी सुरू केली आहे. गेला हंगाम पार बुडाला. त्यात दिशानिर्देशांची स्पष्टता नाही. हातात पैसा नसल्याने कर्जावर भर द्यावा लागणार आहे. मात्र, कुणी कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे, शासनाने मूर्तींच्या आकारावर आणि उत्सवावर लादलेले निर्बंध पूर्णत: बाद करावे. जेणेकरून गेल्या वर्षीची तूट भरून काढता येईल.
- सुरेश पाठक, मुख्य संयोजक : हस्तशिल्पी बहुउद्देशीय संस्था,नागपूर
....................