नागपुरातून २०१९ मध्ये उडणार सी-प्लेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:03 PM2017-11-30T23:03:21+5:302017-11-30T23:07:36+5:30
सी-प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरिटाईन बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये एमओयू झाला असून, २०१९ मध्ये कोराडी येथून सी-प्लेन उड्डाण घेणार, असे राज्याचे ऊर्जा व अबकारी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सी-प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरिटाईन बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये एमओयू झाला असून, २०१९ मध्ये कोराडी येथून सी-प्लेन उड्डाण घेणार, असे राज्याचे ऊर्जा व अबकारी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बावनकुळे यांनी सांगितले की, सी-प्लेनबाबत काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत. कोराडी येथून सी-प्लेन उडणार आहे. महाजेनकोने कोराडीतील तलावासह पारस येथील महाजेनकोचा तलावही उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक सर्व मंजुरीही मिळालेल्या आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये सी-प्लेनचे उड्डाण शक्य आहे. सी-प्लेन हा कोराडी ते खिंडसी (रामटेक), कोराडी ते ताडोबा (इटियाडोह), कोराडी ते अंबाझरी आणि कोराडी ते शेगाव (पारस) असे उड्डाण होईल. आनंदसागर येथील तलावात सी-प्लेन उड्डाण करणे शक्य नसल्याने ते पारस येथे उतरेल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कोराडीत साकारतोय ‘सॅक्लोरामा’
कोराडी देवस्थान परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे २१० कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातून ६५ कोटीची विकास कामे सुरू आहेत. बगीचा, रंगमंच, भोजन शेड, भक्त निवास, दर्शकदीर्घा आदी कामे होणार आहेत. यासोबतच महाजेनकोच्यावतीने ‘सॅक्लोरामा’ साकारण्यात येत आहे. २५ कोटी रुपये खर्चून ते तयार होत आहे. १५० आसनक्षमता आहे. यामध्ये ३२ मिनिटंचा शो दाखविला जाईल. यात जगातील विविध देशांतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, भारतातील, महाराष्ट्रातील व नागपुरातील पर्यटन स्थळे दाखविली जातील. येथे बसून ही पर्यंटन स्थळे आपण स्वत: पाहून आल्याचा भास होईल. यासोबतच वीज कशी तयार होते, हे सुद्धा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.