नरखेड तालुक्यातील २० गावे सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:08 AM2021-05-17T04:08:09+5:302021-05-17T04:08:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : नरखेड तालुक्यातील वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील २० ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मेंढला : नरखेड तालुक्यातील वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्या आदेशान्वये तालुक्यातील २० गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आली असून, त्या गावांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या गावांमधील नागरिकांनी विनाकारण फिरू नये व दुसऱ्या गावात जाऊ नये तसेच बाहेर गावातील व्यक्तीस गावात प्रवेश देऊ नये, असे आवाहन तहसीलदार डी.जी. जाधव यांनी केले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घाेषित करण्यात आलेल्या गावांमध्ये जलालखेडा, राेहणा, थडीपवनी, देवग्राम (थुगावदेव), सिंदी, खैरगाव, दावसा, उमरी (सिंदी), मोहदी (धोत्रा), नारसिंगी, कोणी (येणीकाेणी), मेंढला, उमठा, मसोरा, मोहदी (दळवी), खेडी (कर्यात), मालापूर, नांदा (शिंदे), खंडाळा (बु.) व करंजोली या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये काेराेना संक्रमण थाेडे अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी तसेच येथील संक्रमण इतरत्र पसरू नये यासाठी ३१ मेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. यात प्रत्येकाने मास्कचा नियमित वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असून, या गावांमधील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सांगितले.
दुसरीकडे, या गावात प्रवेश करणारे मुख्य मार्ग सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर अथवा गावाबाहेर पडू नये. विनाकार फिरणे टाळावे. बाहेरगावांमधील नागरिकांना गावात प्रवेश देणे टाळावे, असे आवाहन तहसीलदार डी.जी. जाधव यांनी केले आहे. या गावांमधील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. यातील गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची साेय तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावी तसेच तिथे बेड, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर यासह अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी दिलेश ठाकरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
..या बाबींची मुभा
या प्रतिबंधित गावांमधील नागरिकांना वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार, शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित असलेले खासगी डाॅक्टर्स, नर्स, औषधी दुकानदार, पॅथाॅलाॅजिस्ट, रुग्णवाहिका यांच्यासह पाेलीस विभागामार्फत पासधारक जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना मुभा देण्यात आली आहे.