व्हॉट्स अॅपमुळे लागला वडिलांचा शोध
By admin | Published: March 6, 2016 02:56 AM2016-03-06T02:56:28+5:302016-03-06T02:56:28+5:30
रागाने घर सोडून कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसून जयपूरकडे जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हॉट्स अपवर फोटो पाठवून रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या गाडीत या व्यक्तीचा शोध लावल्याची घटना शनिवारी घडली आहे.
नागपूर : रागाने घर सोडून कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसून जयपूरकडे जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हॉट्स अपवर फोटो पाठवून रेल्वे सुरक्षा दलाने धावत्या गाडीत या व्यक्तीचा शोध लावल्याची घटना शनिवारी घडली आहे.
सिव्हिल लाईन्स येथील मनोरुग्ण असलेल्या वडिलांचे त्यांच्या मुलींसोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे त्यांनी आपली कार घेऊन थेट रेल्वेस्थानक गाठले. रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये कार उभी करून त्यांनी ड्रायव्हरला कार घेऊन जाण्यास सांगितले. लगेच त्यांच्या मुलींनी रेल्वे सुरक्षा हेल्पलाईन १८२ वर संपर्क साधून रेल्वे सुरक्षा दलाला या घटनेची माहिती दिली.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक होती लाल मिना यांनी सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या मुलींना दाखविले. याशिवाय त्यांच्या वडिलांचा फोटो आरपीएफच्या ग्रुपवर पाठविला. घटनेची माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित मुलींचे वडील एका टीसी सोबत बोलताना आणि त्यानंतर प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२९६९ कोईम्बतूर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसल्याचे आढळले.
नेमक्या याच गाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी प्रवास करीत होते. त्यांचा फोटो काढून व्हॉट््स अपवर पाठविला. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान विकास शर्मा याने त्यांच्या मुलींना हा फोटो दाखविताच त्यांनी आनंद व्यक्त करून रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेने कार्य करण्याच्या कृतीबद्दल त्यांना धन्यवाद दिले.(प्रतिनिधी)