शोधमोहिम स्थगित, शिधापत्रिकाधारकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:08+5:302021-04-02T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी शासनाने मोहीम सुरू केली होती. यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी शासनाने मोहीम सुरू केली होती. यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी तपासणी मोहीम राबविली आहे. यात भरून द्यावयाच्या अर्जात गॅस सिलिंडरसह विविध प्रकारची माहिती द्यावयाची होती. या मोहिमेमुळे गॅस सिलिंडर असेल तर शिधापत्रिका रद्द तर होणार नाही ना? अशी भीती शिधापत्रिकाधारकांमध्ये पसरली होती. यामुळे नागरिक चांगलेच संतापले होते. नागरिकांचा यासंदर्भात वाढत असलेला रोष पाहता शासनाने ही शोधमोहिमच स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला.
रेशन दुकानदाराला भरून देण्यात येणाऱ्या अर्जात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. या माहितीसोबतच सर्व सदस्यांचे आधारकार्ड, वीज बिलाची झेरॉक्स, गॅस कनेक्शनचे कार्ड जोडायचे आहे. या अर्जाच्या मागील भागाला हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात ‘कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे’, असे हमीपत्र भरून द्यावे लागत होते. त्यामुळे भविष्यात आपले रेशन बंद होईल, या भीतीने लोकांमध्ये असंतोष पसरला. लोकमतनेसुद्धा हा विषय लावून धरला. नागरिकांचा वाढत असलेला विरोध लक्षात घेता, अन्न व नागरी पुरवठा विभागाने अखेर ही शाेधमोहिम स्थगित केली.