दुर्मिळ कासवाच्या अधिवासाचा आता वनविभागाकडून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 10:49 PM2021-07-01T22:49:07+5:302021-07-01T22:49:36+5:30
Search for rare turtle habitat दक्षिण भारतामधील नद्यांमध्ये वास्तव्य असणारा लेइथ्स सॉफ्टसहेल हा कासव हिंगणातील परिसरात पोहोचलाच कसा? असा प्रश्न आता वनविभागापुढे निर्माण झाला आहे. त्याच्या येथील अधिवासाची माहिती काढण्याच्या कामी वनविभाग लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण भारतामधील नद्यांमध्ये वास्तव्य असणारा लेइथ्स सॉफ्टसहेल हा कासव हिंगणातील परिसरात पोहोचलाच कसा? असा प्रश्न आता वनविभागापुढे निर्माण झाला आहे. त्याच्या येथील अधिवासाची माहिती काढण्याच्या कामी वनविभाग लागला आहे. मात्र त्याचा अधिवासच कळला नसल्याने त्याला सोडायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूरलगत हिंगणा परिसरात आढळलेल्या या कासवासंदर्भात वनविभागाने वाइल्ड लाइफ इंन्स्टिट्यूट देहरादूनकडे माहिती पाठविली आहे. तेथील एका वैज्ञानिकाने कर्नाटकातील साली नदीमध्ये आढळणाऱ्या लेइथ्स सॉफ्टसहेल कासवावर पर विस्तृत अभ्यास केला आहे. हा दुर्मिळ कासव फक्त कर्नाटक आणि केरळमधील गोड्या पाण्याच्या नदीमध्ये आढळतो. यापूर्वी या प्रजातीच्या ७२० सेंटीमीटर लांबीच्या कासवांवर अभ्यास झाला आहे. मात्र प्रथमच ८२० सेंटीमीटर लांबीचा हा कासव हिंगणात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वणा नदीमधून तो भटकून आला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. ज्या परिसरात हा कासव फिरताना आढळला, त्याजवळच एक बांधकाम सुरू आहे. त्यासाठी रेतीचा मोठा साठा करण्यात आला आहे. या रेतीसोबत तर कासव हिंगण्यात आला नसावा, अशीही शक्यता आहे. यासंदर्भात संबंधित रेती कंत्राटदाराकडे विचारणा केल्यावरच कळणार आहे. या कासवासोबत काही अंडीही आली असावी का, या दृष्टीनेही तपास घेतला जात आहे.