पाण्याच्या शोधात बिबट्या पोहचला थेट नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:51 AM2018-04-16T09:51:50+5:302018-04-16T09:52:01+5:30
पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे भरकटलेल्या बिबट्याने नागपुरातील डिगडोह (देवी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलीसनगर भागात रविवारी तब्बल आठ तास हैदोस घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/हिंगणा : पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे भरकटलेल्या बिबट्याने नागपुरातील डिगडोह (देवी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलीसनगर भागात रविवारी तब्बल आठ तास हैदोस घातला. पोलीसनगर येथील रहिवासी पराग बायस्कर यांच्या घराच्या मागील भागात असलेल्या बाथरूममध्ये सकाळी ८.१० वाजता शिरलेल्या या बिबट्याने वन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेला घाम फोडला. तब्बल साडेचार तास चाललेल्या रेस्क्यू आॅपरेशननंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने वन कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. पोलीसनगरात बिबट्या शिरल्याची बातमी पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली. हिंगण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांनी लगेच रेस्क्यू टीमला सूचना दिली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरुवातीला तीन आणि नंतर चार डॉट्स लावून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतुु, अडचणी जागा आणि योग्य निशाणा बसत नसल्याने प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसरीकडे, आक्रमक बिबट खिडकीतून डोकावत गुरगुरत होता.
परिणामी, वन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने गर्दी हटविली. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्याने सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये आडोशाला बसलेल्या बिबट्याला पाणी शिंपडून उठविले. त्याचवेळी खिडकीतून शॉटगनने त्याच्या दिशेने डॉट्स मारण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठला आणि बिबट बेशुद्ध पडला. खात्री पटताच दार उघडून त्याला जाळीत बांधून नेण्यात आले. यावेळी उपवन संरक्षक मल्लिकार्जुन, सहाय्यक विनायक उमाळे, यु. बी. भामकर, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांच्यासह रेस्क्यू पथकाचे आरएफओ निंबेकर, डॉ. गौतम भोजने, डॉ. व्ही. एम. धुत, सनी मगर, वरद धुत तळ ठोकून होते.
वाघ आला... वाघ आला...
बिबट पराग बायस्कर यांच्या बाथरूममध्ये शिरण्याआधी त्यांचे शेजारी मनीष रंगारी यांच्या घराच्या आवारात होता. त्याने वॉल कम्पाऊंडवरून उडी मारत बायस्कर यांच्या घराच्या मागच्या भागात प्रवेश केला. त्याचवेळी शेजाऱ्यांनी ‘वाघ आला... वाघ आला..’ अशी आरडाओरड करायला सुरुवात केली. आवाज ऐकताच बायस्कर यांनी घराचा मुख्य दरवाजा तत्काळ बंद केला. तो मागच्या भागात असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान बाळगत बाथरूमचेही दार बंद केले आणि बिबट कैद झाला.
पाण्यासाठी भटकला
हा बिबट अंदाजे तीन वर्षांचा आहे. त्याला नागपुरातील वन विभागाच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याची तपासणी व उपचार करून जंगलात सोडले जाईल, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या परिसरालगत जंगली भाग नाही. मात्र, तो कान्होलीबारा, कवडस किंवा सोनेगावच्या जंगलातून पाणी किंवा खाद्याच्या शोधात नागरी वस्तीकडे आला असावा, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.