ग्वालबन्सीच्या फरार साथीदारांचा शोध सुरू
By admin | Published: June 11, 2017 02:05 AM2017-06-11T02:05:13+5:302017-06-11T02:05:13+5:30
महाराष्ट संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलेला कुख्यात भूमाफिया
ठिकठिकाणी झडती : नातेवाईकांकडे विचारपूस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलेला कुख्यात भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबन्सी (वय ४६, रा. मकरधोकडा) याच्या फरार गुंड साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. त्यासाठी शनिवारी त्यांच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली.
गिट्टीखदान, मानकापूर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २५ वर्षांपासून गुंडाराज चालवून या भागातील अनेक नागरिकांना अक्षरश: वेठीस धरणाऱ्या दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील चार गुंडांसह पाच जणांवर पोलिसांनी मोक्का अन्वये गुन्हे दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री जाहीर केली. दिलीपसोबत मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईश्वर बाबूराव सुप्रतकर (वय ४६, रा. झिंगाबाई टाकळी), अॅन्थोनी ऊर्फ जितू जॉन स्वामी (वय ४७), प्रेम चुन्नीलाल यादव (वय ४३, रा. मकरधोकडा) आणि पप्पू ऊर्फ राहुल रामाश्री यादव (वय २८, रा. शिवकृष्णधाम झोपडपट्टी) यांचा समावेश आहे. हे सर्वच्यासर्व फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस धावपळ करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, उपरोक्त चौघांच्याही घरी वेगवेगळ्या पोलीस पथकांनी चौकशी चालवली आहे. सुप्रतकर, स्वामी, प्रेम यादव आणि पप्पू यादवच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी विचापूस चालवली आहे. ते कुठे आहेत, कोणत्या नातेवाईकांकडे, मित्रांकडे दडून आहेत, त्याबाबतही पोलिसांनी उपरोक्त चौघांकडे विचारणा केली आहे. त्यांचे संपर्क क्रमांकही पोलिसांनी शोधले आहेत. ज्या ठिकाणी आरोपींचे नातेवाईक, घनिष्ठ मित्र आहेत तिकडेही पोलिसांनी नजर वळविली आहे.
कोण आहे पाठीराखा ?
दिलीपसोबतच नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी आणि गंगाप्रसाद ग्वालबन्सी यांच्याविरुद्धही पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत तसे गुन्हेही दाखल झालेले आहेत मात्र, या आरोपींची पाठराखण करणाऱ्यांनी पोलिसांवर सुनियोजित पद्धतीने दडपण आणण्यात यश मिळवले. त्यामुळे ते मोकळे फिरत आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेले आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात उठबस करीत आहे. एवढा बिनधास्तपणा हे आरोपी कुणाच्या बळावर दाखवत आहे, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.
म्होरके लवकरच गजाआड
ग्वालबन्सीचा भागीदार म्हणून ओळखला जाणारा अप्पू सर्वत्र कुपरिचित आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जमिनीशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलविले. त्याला अटक केली जाणार, अशी अपेक्षा असताना अप्पूला पोलिसांनी मोकळे केले. ग्वालबन्सीची टोळी भलीमोठी आहे. त्यात केवळ एक दिलीप सोडला तर बहुतांश जण मोकाट असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिसांनी एकीकडे बेधडकपणे दिलीपच्या मुसक्या बांधल्या. त्याच्यावर मोक्कासारखी कारवाईदेखिल केली. मात्र, दुसरीकडे नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, शैलेश ग्वालबन्सी तसेच त्यांच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना अद्याप अटक न झाल्याने पोलिसांवरील दडपणाची सर्वसामान्यांना कल्पना आली आहे. ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. वरिष्ठ पातळीवर ही अस्वस्थता चर्चेच्या रूपाने अधोरेखित होत असल्यामुळे पुन्हा ग्वालबन्सी टोळीतील काही म्होरके लवकरच गजाआड होण्याचे संकेत मिळत आहेत.