गोंधळात जिचकारांवर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:26 AM2017-09-16T00:26:26+5:302017-09-16T00:26:51+5:30
महापालिका सभागृहात प्रामुख्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात एखाद्या मुद्यावरून खडाजंगी होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका सभागृहात प्रामुख्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात एखाद्या मुद्यावरून खडाजंगी होते. परंतु शुक्रवारी नामनिर्देशित सदस्याच्या नियुक्तीवरून काँग्रेसच्या नगरसेवकांत आपसात खडाजंगी झाली. एका गटाने किशोर जिचकार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला. परंतु महापौर नंदा जिचकार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सुचविलेल्या किशोर जिचकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
वास्तविक प्रश्नोत्तराच्या तासानंतरच नामनिर्देशित सदस्यांचा विषय पुकारला जाणार होता. मात्र सत्तापक्षाने आधी अजेंड्यावरील इतर विषयावर चर्चा केली. कामकाज संपताना हा विषय पुकारण्यात आला. महापौरांनी हा विषय पुकारताच संजय महाकाळकर यांनी जिचकार यांच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध करीत त्यांच्या प्रस्तावासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र जोडले आहे का अशी विचारणार केली. असल्यास सभागृहाला माहिती देण्याची सूचना केली. महाकाळकर यांच्या आक्षेपाला विरोध करीत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी जिचकार यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी केली. निवडणुकीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रूपांतर महापालिका काँग्रेस पार्टीत होते. उच्च न्यायालयानेही विकास ठाकरे यांची याचिका खारिज केली आहे. त्यामुळे जिचकार यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेसमधील अंतर्गत भांडणाला सभागृहात मांडण्याची गरज नसल्याचे गुडधे म्हणाले.
जिचकार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवित संदीप सहारे म्हणाले,तानाजी वनवे यांना काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांना विरोधीपक्षनेता करण्यात आले. परंतु किशोर जिचकार यांना नामनिर्देशित सदस्य करण्यासंदर्भात नगरसेवकांसोबत चर्चाच केलेली नाही. त्यामुळे माझ्यासह पाच नगरसेवकांनी जिचकार यांच्या नावाला विरोध केला आहे. यासंदर्भात आयुक्तांनाही पत्र दिले आहे. सहारे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मनोज सांगोळे म्हणाले, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. या न्यायालयाच्या निर्णयापर्यंत हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली. तर कमलेश चौधरी यांनी जिचकार यांच्या नावाला समर्थन केले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची दुर्दशा झाली. जेमतेम २९ जागा निवडून आल्या. परंतु विरोधीपक्षनेता व नामनिर्देशित सदस्यांवरून पक्षातील अंतर्गत वाद सभागृहात चव्हाट्यावर आला.
उच्च न्यायालयात विकास ठाकरे यांची याचिका खारीज करण्यात आली आहे. त्यामुळे वनवे यांनी सुचविलेले किशोर जिचकार यांना नामनिर्देशित सदस्य करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले तरी न्यायालयाच्या आदेश मानला जाईल, अशी भूमिका सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मांडली.
वनवे यांच्या अडचणी कायम
नामनिर्देशित सदस्याच्या मुद्यावरून माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटातील नगरसेवकांनी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्याविरोधात भूमिका घेतली. यावरून वनवे यांच्या अडचणी कायम असल्याचे संकेत मिळाले आहे. वनवे यांची सत्तापक्षासोबत जवळीक वाढल्याचा पक्षातील काही सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे भविष्यात संजय महाकाळकर यांच्याप्रमाणे वनवे यांनाही विरोधीपक्षनेते पदावरून हटविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली. वनवे यांच्या अडचणी कायम
नामनिर्देशित सदस्याच्या मुद्यावरून माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या गटातील नगरसेवकांनी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्याविरोधात भूमिका घेतली. यावरून वनवे यांच्या अडचणी कायम असल्याचे संकेत मिळाले आहे. वनवे यांची सत्तापक्षासोबत जवळीक वाढल्याचा पक्षातील काही सदस्यांचा आरोप आहे. त्यामुळे भविष्यात संजय महाकाळकर यांच्याप्रमाणे वनवे यांनाही विरोधीपक्षनेते पदावरून हटविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली.