नागपुरात दुसरे आंबेडकरी महिला साहित्य संमेलन ८ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:05 PM2019-03-01T22:05:31+5:302019-03-01T22:09:15+5:30
दुसरे अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलन येत्या ८ मार्चपासून नागपूरला होत आहे. ‘आयदान’ या लोकप्रिय कादंबरीच्या लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद्घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून घडलेल्या स्त्री लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा आणि आंबेडकरी साहित्य प्रवाहातील नवसाहित्यिकांना दिशा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसरे अखिल भारतीय आंबेडकरी महिलासाहित्य संमेलन येत्या ८ मार्चपासून नागपूरला होत आहे. ‘आयदान’ या लोकप्रिय कादंबरीच्या लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद्घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून घडलेल्या स्त्री लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा आणि आंबेडकरी साहित्य प्रवाहातील नवसाहित्यिकांना दिशा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे.
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ८, ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथे संमेलनाचा सोहळा चालणार असून ११ राज्यातून साहित्यिक व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महामंडळाचे प्रा. सतेश्वर मोरे यांनी माहिती दिली. ८ मार्चला दुपारी ४ वाजता संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून संमेलनाची पायाभरणी होईल. ९ रोजी सकाळी १० वाजता दीक्षाभूमीत संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी ऊर्मिला पवार व नूर जहीर यांच्यासह जापानच्या डॉ. मिकी इनोकी, अमेरिकेच्या डॉ. वृंदा साखरकर, कर्नाटकच्या बामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी काही साहित्यिकांच्या पुस्तकांचे विमोचन होईल. दुपारी १.३० वाजता पश्चिम बंगालच्या कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्था’ विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३.३० वाजता झारखंडच्या प्रसिद्ध लेखिका निर्मला पुतुल यांच्या अध्यक्षतेत ‘आंबेडकरी साहित्यातील स्त्री-अस्मिता...’ विषयावर चर्चासत्र होईल. ६.३० वाजता आंबेडकरी काव्य संध्या होईल. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत संजय जीवने लिखित ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सांची जीवने सादर करतील. त्यानंतर पल्लवी जीवनतारे लिखित व दिग्दर्शित ‘संविधान’ या पथनाट्याचे सादरीकरण होईल.
१० मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ९.३० वाजता विशेष अभिवादन कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता दिल्लीच्या डॉ. रजनी दिसोडिया यांच्या अध्यक्षतेत परिचर्चा आणि दुपारी १ वाजता स्वानुभव कथनाचा कार्यक्रम होईल. ‘स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल, त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजता येते’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानावर विधान चर्चा दुपारी ३ वाजता होईल. सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप आणि साहित्य व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येईल. यावेळी ऊर्मिला पवार यांच्यासह डॉ. विमल थोरात, डॉ. इंदिरा आठवले प्रामुख्याने उपस्थित राहतील. पत्रपरिषदेत संबुद्ध महिला संघाच्या छायाताई खोब्रागडे, जलदा ढोके, हंसा नारनवरे, विशाखा कांबळे, सुगंधा खांडेकर, सुरेखा लोकरे, सुषमा कळमकर, पुष्पा घोडके आदी उपस्थित होते.