सेकंड डे सेकंड क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:34+5:302021-01-20T04:10:34+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशीचे चित्र ‘फर्स्ट डे फर्स्ट क्लास’ होते; परंतु मंगळवारी झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशीचे चित्र ‘फर्स्ट डे फर्स्ट क्लास’ होते; परंतु मंगळवारी झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र ‘सेकंड डे सेकंड क्लास’ असे राहिले. पहिल्या दिवशीच्या तुलनेत मंगळवारी झालेल्या लसीकरणात १०.२६ टक्क्याने घट झाली. पहिल्या दिवशी ६४.९२ टक्के, तर मंगळवारी ५४.६६ टक्के लसीकरण झाले. नागपूर जिल्ह्यातील १२ केंद्रांना १२०० लसीकरणाचे लक्ष्य होते; परंतु ६५६ लाभार्थ्यांनी लस घेतली. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश केला असताना त्यांच्याकडूनच लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शहरातील १० हजार, तर ग्रामीणमधील ७ हजार ८००, अशा एकूण १७ हजार ८०० लाभार्थ्यांना सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’, तर ५ हजार लाभार्थ्यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ १६ जानेवारी रोजी झाला. शहरातील पाच, तर ग्रामीणमधील सात, अशा एकूण १२ केंद्रांना प्रत्येकी १०० नुसार १२०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. यातील ७७९ लाभार्थ्यांनी लस घेतली. दोन दिवसांच्या विश्रांतीनगर मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून १२ केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली; परंतु सायंकाळपर्यंत ५६५ लाभार्थी लस घेण्यास पुढे आले. सर्वांत कमी लसीकरण मेडिकलच्या केंद्रावर, तर सर्वांत जास्त लसीकरण उमरेड केंद्रावर झाले.
-शहरातील पाचही केंद्रांवर ५० वर लसीकरण नाही
शहरातील पाच केंद्रांना प्रत्येकी १०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु एकाही केंद्रावर ५० च्या वर लसीकरण झाले नाही. मनपाच्या पाचपावली येथील स्त्री रुग्णालय केंद्रावर ३२, ‘एम्स’चा केंद्रावर ४७, मेडिकल केंद्रावर २९, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय केंद्रावर ३२, मेयोच्या केंद्रावर ४५, अशा एकूण १८५ लाभार्थ्यांनी लस घेतली. लक्ष्याच्या तुलनेत ३७.६ टक्केच लसीकरण झाले.
-ग्रामीणमध्ये ४७१ लाभार्थ्यांना दिली लस
ग्रामीणमधील सात केंद्रांना ७०० लाभार्थ्यांचे लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते; परंतु ४७१ लाभार्थ्यांनी लस घेतली. यात हिंगणा केंद्रावर ३५, कामठी केंद्रावर ५७, काटोल केंद्रावर ६१, रामटेक केंद्रावर ७३, सावनेर केंद्रावर ६८, उमरेड केंद्रावर ९८, तर डिगडोह केंद्रावर ७९ लाभार्थ्यांनी लस घेतली.
-लसीकरणात पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर
लसीकरण मोहिमेत शहरात पुरुषांच्या तुलनेत महिला आघाडीवर असल्याचे पुढे आले. मंगळवारी ५५ पुरुष, तर १०१ महिलांनी लस घेतली. पाचपावली केंद्रावर एकाच पुरुषाने, तर ३१ महिलांनी लस घेतली. ‘एम्स’ केंद्रावर २१ पुरुष व २६ महिलांनी, मेडिकल केंद्रावर २० पुरुष ९ महिला, डागा केंद्रावर ९ पुरुष २३ महिला, तर मेयो केंद्रावर २५ पुरुष व २१ महिलांनी लस घेतली.
केंद्र लसीकरण
पाचपावली ३२
एम्स ४७
मेडिकल २९
डागा ३२
मेयो ४५
हिंगणा ३५
कामठी ५७
काटोल ६१
रामटेक ७३
सावनेर ६८
उमरेड ९८
डिगडोह ७९