दुसरा दिवस संपाचा : कामगारांची केंद्राच्या धोरणाविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:35 PM2019-01-09T22:35:54+5:302019-01-09T22:36:45+5:30
दहा केंद्रीय कामगार संघटना व ४४ औद्योगिक श्रमिक फेडरेशनच्या आवाहनानुसार दोन दिवसीय संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्य आणि केंद्रीय कार्यालयात तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट होता. शुक्रवारी सर्व कामगार आणि बँक व आयुर्विमा कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात एकत्र येऊन केंद्र शासनाच्या कामगार व कर्मचारीविरोधी आणि आर्थिक धोरणाचा विरोध करीत नारे-निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा केंद्रीय कामगार संघटना व ४४ औद्योगिक श्रमिक फेडरेशनच्या आवाहनानुसार दोन दिवसीय संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्य आणि केंद्रीय कार्यालयात तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट होता. शुक्रवारी सर्व कामगार आणि बँक व आयुर्विमा कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात एकत्र येऊन केंद्र शासनाच्या कामगार व कर्मचारीविरोधी आणि आर्थिक धोरणाचा विरोध करीत नारे-निदर्शने केली.
बँकांमध्ये ५०० कोटींचे व्यवहार ठप्प
दोन दिवसीय संपामुळे नागपुरातील बँकांच्या ५०० पेक्षा जास्त शाखांमध्ये ५५० कोटींपेक्षा जास्तचे क्लिअरिंग झाले नाहीत. शिवाय ६०० कोटींपेक्षा जास्तचे व्यवहार ठप्प झाले. दोन दिवस बँक बंद असल्यामुळे शहरातील ८० टक्के एटीएम रोखीअभावी बंद होते. त्यामुळे ग्राहकांना एकीकडून दुसऱ्या एटीएमकडे धाव घ्यावी लागली. त्याचा ग्राहकांना त्रास झाला. याशिवाय आयुर्विमा कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प राहिले.
ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशन
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) चेअरमन सत्यशील रेवतकर म्हणाले, संपाच्या दुसºया दिवशी बँकांचे ३०० पेक्षा जास्त कर्मचारी संविधान चौकात आले. त्यांनी केंद्र शासनाच्या कर्मचारीविरोधी निर्णयाचा निषेध केला. बँकांच्या नऊ संघटनांपैकी एआयबीईए, एआयबीओए आणि बीईएफआय या तीन संघटनांचा संपात सहभाग होता. सर्व अधिकारी असोसिएशन्सने संपाला पाठिंबा दिला होता. यावेळी एआयबीईएचे अध्यक्ष सुरेभ बोभाटे, उपाध्यक्ष हरी रामानी, अरूण सोनडवले, सहसचिव सुनील बेलखोडे, स्वयंप्रकाश तवाी, प्रभात कोकस, रवी जोशी, दर्शन नायडू, विजय ठाकूर आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सीटू) नेतृत्वातील सर्व युनियनमधील १०० टक्के कामगार संपात सहभागी झाले. सीटूच्या नेतृत्वातील अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी, कपास अनुसंधान केंद्रातील कर्मचारी, वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी एमएसएमआरएच्या नेतृत्वात, नागपूर जनरल लेबर युनियनच्या नेतृत्वात हॉस्पिटल, महात्मे आय बँक कर्मचारी, स्पेस वुड कामगार, बीपी इरगो कामगार, हॉटेल कामगार, मद्य उद्योगातील कामगारांनी संपात भाग घेतला. कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील अंकुर सीड्स, केम्सफिल्ड सेक्युलरच्या कामगारांनी अशोक वडनेरकर यांच्या नेतृत्वात रॅली काढली. संप यशस्वी झाल्याचे सीटूच्या नागपूर डिस्ट्रिक्ट कमिटीचे महासचिव दिलीप देशपांडे यांनी सांगितले.
असंघटित कामगारांचा दुसऱ्या दिवशीही हल्लाबोल
केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून भरघोस प्रतिसाद लाभला. सलग दुसऱ्या दिवशीही असंघटित क्षेत्रातील कामगारांनी संविधान चौकात सरकारच्या विरोधात हल्लाबोल कायम ठेवला. यात कोळसा कामगार, बिडी कामगार, स्टील उद्योगातील कामगार, शासकीय कंत्राटी कामगार, हॉकर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोषण आहार योजनेतील कामगार आदी सहभागी झाले होते. संविधान चौकात कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित सभेला मोहनदास नायडू, एस.क्यू. जमा, मारोती वानखेडे, माधव भोंडे, जयवंत गुरवे, अरुण वनकर, प्रशांत पवार, राजेंद्र साठे, गांगुली, चंद्रहास सुटे, मधुकर भरणे, बीएनजे शर्मा आदी उपस्थित होते. आयटकचे राज्य सचिव श्याम काळे म्हणाले की या संपानंतर फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण देशात कामगार जेलभरो करून मोदी सरकारच्या अस्तित्वाला शेवटचा धक्का देणार आहे.
महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असो.
असोसिएशनचे युनिट सचिव प्रवीण माणूसमारे यांनी वैद्यकीय प्रतिनिधींचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. सीटूच्या नेतृत्वात रॅली काढून संविधान चौकातील सभेत निषेध नोंदविला. एमएसएमआरएचे ३०० पेक्षा जास्त वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी संपात सहभागी झाले. संपात रोशन खोरगडे, वैभव जोगळेकर, वैशाली डहारे, अंजुम शेख, चंद्रकांत बनसोड, संदेश शाहू, मयूर खोब्रागडे, अभिषेक पांडे, गौरव ठाकूर, महेश पाटणसावंगीकर, अजय ताडपिल्लेवार, हेमंत हाडगे उपस्थित होते.
विदर्भ ब्रेव्हरीज मजदूर युनियन
मद्य उद्योगातील कामगारांना १८ हजार रुपये वेतन आणि १५ टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी विदर्भ ब्रेव्हरीज मजदूर युनियनने संपादरम्यान केली. युनियनचे महासचिव अमृत मेश्राम यांनी कंत्राटी कामगार प्रथा बंद करा आणि कंत्राटी कामगारांना स्थायी करा, बंद कारखाने व सार्वजनिक उद्योग सुरू करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा सीटूचे उपाध्यक्ष बबन पवार, विप्लव मेश्राम, शालिनी राऊत, विठ्ठल नगरारे, रूपा कवडे, अनिता सोनकर, सुधाकर तिबोले, आशिष काशीमकर, बेबीबाई राऊत, धनराज टोंगळे,सतीश नाईक, सिंधूताई पवार, शामराव कोसारे, संजय बुटले, बलवं येडगे, विलास हिवंज, सिद्धार्थ लांजेवार, अशोक राऊत, प्रभाकर कुंभारे, आशा नागपुरे, राजन नंदनवार, सुरेश बगडते, जीजाबाई वाटकर उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचारी सभा
अंगणवाड्या बंद ठेवून अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी झाले. सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकर माना, मानधनाऐवजी वेतन द्या, भाऊबीजेऐवजी बोनस देण्याची मागणी केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा जयश्री काळे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्ला, रूपचंद्र गद्रे, प्रमिला मर्दाने, शीला डुमरे, माया ढाकणे, उज्ज्वला नारनवरे, शीला जगताप, उषा हाडके, अशोक गुरव, खोब्रागडे, सोनी गोसावी, मीना ढेंगे, शोभा गायकवाड, आशा रामटेके, लीला मेहर, आशा पाटील आणि अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
आयुर्विमा महामंडळात कामकाज ठप्प
गुरुवारी आयुर्विमा मुख्यालयासमोर विमा कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. रोखीच्या व्यवहारासह सर्व सेवा ठप्प होत्या. यावेळी अनिल ढोकपांडे, पी.मिलिंदकुमार, रमेश पाटणे, टी.के.चक्रवर्ती, नरेश अडचुले, राजेश विश्वकर्मा, शिवा निमजे, अभय पाटणे, हरी शर्मा, विवेक जोशी, लक्ष्मण मौदेकर, संजय लांजेवार, अशोक मेश्राम, शैला देशपांडे उपस्थित होते.