नागपुरात ५० स्वयंसेवकांना कोविशिल्डचा दुसरा डोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 10:26 PM2020-11-26T22:26:48+5:302020-11-26T22:29:25+5:30
Second dose of Covishield , nagpur newsकोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोज २३ ऑक्टोबरला देण्यात आल्यानंतर दुसरा डोज मागील दोन दिवसांत देण्यात आला. डोज देण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोज २३ ऑक्टोबरला देण्यात आल्यानंतर दुसरा डोज मागील दोन दिवसांत देण्यात आला. डोज देण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता ५६ व १८० व्या दिवशी या सर्वांची रक्ताची तपासणी केली जाणार आहे.
‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या महिन्यात नागपूर मेडिकलला या चाचणीची परवानगी मिळाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभागप्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात तिसऱ्या टप्प्यातील या चाचणीला सुरुवात झाली. लस देण्यात आलेले स्वयंसेवक हे १८ ते ७० वयोगटातील आहेत. यात २० महिला, ६०वर्षांवरील पाच जेष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, लस देण्यात आलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्वांची प्रकृती उत्तम आहे. दुसरा डोज २८ दिवसानंतर देण्यात आला. आता ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृतीविषयी चौकशी केली जाईल.