राज्यात दुसऱ्या डोसचे लसीकरण ३१ टक्क्यांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:11 AM2021-09-17T04:11:55+5:302021-09-17T04:11:55+5:30
नागपूर : कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा भाग असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणातील दुसऱ्या डोसला अद्यापही हवी तशी गती आली नाही. ...
नागपूर : कोरोना विरुद्धच्या लढाईत महत्त्वाचा भाग असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणातील दुसऱ्या डोसला अद्यापही हवी तशी गती आली नाही. परिणामी, राज्याच्या आठही विभागात दुसऱ्या डोसचे लसीकरण ३१ टक्क्यांच्या आत आहे. विशेष म्हणजे, पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर, पुणे व नागपूर असून, शेवटच्या स्थानी लातूर विभाग आहे.
कोरोना लसीकरणाची मोहीम जानेवारी महिन्यात सुरू झाली. डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचे संपूर्ण लसीकरण म्हणजे, पहिला व दुसरा डोस देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत लसीचा कमी पुरवठा होत असल्याने लसीकरण मोहिमेला अद्यापही अपेक्षेनुसार गती आली नाही. राज्यात सर्वाधिक पहिला डोस कोल्हापूर विभागातील नागरिकांनी घेतला आहे. येथे ७५.४५ टक्के लसीकरण झाले. पुणे विभागात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७४.८२ टक्के आहे. नागपूर विभागात हेच प्रमाण ७४.१९ टक्के, ठाणे विभागात ५९.०६ टक्के, नाशिक विभागात ४८.९६ टक्के, अकोला विभागात ४८.५१ टक्के, औरंगाबाद विभागात ४६.३८ टक्के, तर लातूर विभागात ४४.८० टक्के आहे.
-कोल्हापूर विभागात दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ३१.४६ टक्के
राज्यात कोल्हापूर विभागात पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचे प्रमाण ३१.४६ टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर पुणे विभाग आहे. ३१.०७ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय नागपूर विभागात २४.६१ टक्के, ठाणे विभागात २३.४८ टक्के, अकोला विभागात १८.५७ टक्के, नाशिक विभागात १७.४६ टक्के, औरंगाबाद विभागात १५.५३ टक्के, तर सर्वांत कमी लातूर विभागात १५.४४ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
-लसीकरणाची स्थिती (१३ सप्टेंबरपर्यंत)
विभाग : पहिला डोस : दुसरा डोस
कोल्हापूर विभाग : ७५.४५ टक्के : ३१.४६ टक्के
पुणे विभाग : ७४.८२ टक्के : ३१.०७ टक्के
नागपूर विभाग : ७४.१९ टक्के : २४.६१ टक्के
ठाणे विभाग : ५९.०६ टक्के : २३.४८ टक्के
नाशिक विभाग : ४८.९६ टक्के : १७.४६ टक्के,
अकोला विभाग : ४८.५१ टक्के : १८.५७ टक्के
औरंगाबाद विभाग : ४६.३८ टक्के : १५.५३ टक्के
लातूर विभाग : ४४.८० टक्के : १५.४४ टक्के