पहिल्या पतीला घटस्फोट न दिल्याने दुसरे लग्न अवैध
By admin | Published: April 10, 2017 03:59 AM2017-04-10T03:59:56+5:302017-04-10T03:59:56+5:30
हयात असलेल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याविना संबंधित महिला दुसरे लग्न करू शकत नाही
नागपूर : हयात असलेल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याविना संबंधित महिला दुसरे लग्न करू शकत नाही. ही बाब डावलून केलेले दुसरे लग्न अवैध ठरते, असा निर्णय नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.
शालिनी व धनराज या दोघांचेही पहिले लग्न झाले होते. धनराजने पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट देऊन १७ फेब्रुवारी २०१३ रोजी शालिनीशी लग्न केले होते. लग्नापूर्वी त्याने शालिनी व तिच्या कुटुंबीयांना पहिल्या लग्नाची माहितीही दिली होती. परंतु शालिनीने पहिले लग्न लपवले होते, तसेच पहिल्या पतीला कायदेशीररीत्या घटस्फोटही दिला नव्हता. धनराजशी लग्न केल्यानंतर शालिनी काही दिवस चांगली राहिली. त्यानंतर तिने क्षुल्लक कारणांवरून भांडणे सुरू केली. तिला धनराजसोबत राहायचे नव्हते. त्यामुळे धनराजने तिला जून २०१३ मध्ये माहेरी सोडून दिले.
दरम्यान, धनराजला शालिनीचे आधीच लग्न झाले असल्याचे, तिला एक मुलगा असल्याचे आणि तिने पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट घेतला नसल्याचे कळले. परिणामी धनराजने लग्न अवैध ठरविण्यासाठी, तर शालिनीने विवाहाधिकार मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ३० मे २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने धनराजची याचिका मंजूर केली, तर शालिनीची याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध शालिनीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. (प्रतिनिधी)
दावा सिद्ध करण्यास अपयश
१०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर फारकतनामा लिहून पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्याचे व संबंधित समाजात ही प्रथा असल्याचे शालिनीचे म्हणणे होते. मात्र तिला हा दावा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे कुटुंब न्यायालयाने तिचे धनराजसोबतचे लग्न अवैध ठरविले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनीही हा निर्णय योग्य ठरविला.