कालिदास महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 08:44 PM2019-02-20T20:44:46+5:302019-02-20T20:45:58+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर येथे महाकवी कालिदास यांच्या ‘ऋतुसंहार’ या रचनेवर आधारित सहा ऋतूंच्या सौंदर्यावर पार पडला. दुसरा टप्पा रामटेक येथे होत आहे. २०१८ मध्येही हा समारोप दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय समितीने घेतला. त्या अनुषंगाने पहिला टप्पा ‘अभिज्ञान शाकुंतल-व्हाईस ऑफ इंडियन वूमन’ या विषयावर आधारित होता. दुसरा टप्पा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर होत आहे. रसिक प्रेक्षकांनी या समारोहाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कालिदास समारोह आयोजन समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
पहिल्या दिवशी किशोर नृत्य निकेतन प्रस्तुत सरस्वती वंदना, अबिर गुलाल, सिद्धी धमाल, मांद्री, बधाई, सुफी गायन राहणार असून, दुसऱ्या दिवशी आदिवासी लिंगो नृत्य, सिद्धी धमाल, गेडी, नौहर्ता, किशोर नृत्य अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कालिदास समारोहाचे देशाच्या सांंस्कृतिक पटलावर स्थान टिकवून ठेवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्तांनी २०१५ मध्ये कालिदास समारोह आयोजन समिती स्थापन केली. ही समिती आणि विभागीय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परंपरेचा पुन्हा आविष्कार’ हे ब्रीद घेऊन कालिदास समारोह रंगणार आहे. २०१६ मध्ये कालिदास यांची कृती ‘कुमारसंभवम’ वर आधारित ‘गुरु देवो महेश्वरा’ हे ब्रीद वाक्य घेऊन हा समारोह आयोजित करण्यात आला. २०१७ पासून कालिदास समारोह दोन टप्प्यात घेण्यात येत आहे.