नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:28 PM2018-02-03T22:28:41+5:302018-02-03T22:30:10+5:30
नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने नागपूर मेट्रोच्या दुस ऱ्या टप्प्याच्या बांधकामासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक व सामाजिक संघटनांकडून सूचना मागविण्यासाठी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, विविध भागांचे सरपंच आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, मेट्रो प्रकल्पासाठी विदेशी आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कर्जाच्या पूर्ततेसाठी प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी प्रकल्पाला शहरातील नवीन विकास केंद्राशी जोडावा लागेल. जिल्हा विकास आराखडा (डीपीआर) तयार करताना लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.
एप्रिल अखेरपर्यंत डीपीआर बनणार,१० हजार कोटींचा खर्च: दीक्षित
बृजेश दीक्षित म्हणाले, राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी डीपीआर बनविण्याची जबाबदारी राईटस्वर सोपविली असून एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर काम सुरू होईल. ४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन राहतील. बहुतांश बांधकाम एलिव्हेटेड राहील. ज्या मार्गावर उड्डाण पूल येईल, त्याठिकाणी डबलडेकर पूल बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात जवळपास १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रारंभी राईटस्चे समूह महाव्यवस्थापक पीयूष कन्सल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मेट्रोच्या विस्ताराकरिता तयार करण्यात येणाऱ्या डीपीआरची माहिती दिली. महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मेट्रो व्हेरायटी चौक ते वाडीपर्यंत न्यावी
आ. सुधाकर देशमुख आणि आ. समीर मेघे यांनी मेट्रो वासुदेवनगर ते वाडी, आठव्या मैलापर्यंत आणि व्हेरायटी चौकापासून वाडीपर्यंत नेण्याची सूचना केली. या सूचनेवर आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
हुडकेश्वर ते नरसाळापर्यंत तिसरा टप्पा व्हावा
नगरसेवक मनोज सांगोळे यांनी नारा-नारीपर्यंत मेट्रो नेण्याची सूचना केली. बावनकुळे यांनी तिसऱ्या टप्प्यात मेट्रो नारा, नारी, कोराडी, खापरखेडा, कळमेश्वर, हुडकेश्वर, नरसाळा, उमरेड पांचगांवपर्यंत नेण्याचे आश्वासन दिले.
४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन
दुसऱ्या विस्तारित टप्प्यात मेट्रोचा खापरी ते बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा कॉलनीपर्यंतचा १९ कि.मी.चा टप्पा असून या मार्गावर ३३ स्टेशन आणि जामठा परिसर, डोंगरगांव, मोहगांव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनीचा समावेश राहील. पारडी ते ट्रान्सपोर्टनगर या चार कि़मी.च्या मार्गावर तीन स्टेशन आणि अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर, आसोली हा भाग आणि आॅटोमोटिव्ह चौक तेकन्हान या १३ कि़मी. लांबीच्या मार्गावर १३ स्टेशन आणि खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस हा भाग, वासुदेवनगर ते वाडी या सहा कि़मी. लांबीच्या मार्गावर दोन स्टेशन आणि रायसोनी कॉलेज परिसर, एमआयडीसी क्षेत्र, आॅर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड तसेच हिंगणा माऊंट व्यू ते हिंगणा तहसील या सहा कि़मी. मार्गावर पाच स्टेशन असून नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गांव, एमआयडीसी या भागांचा समावेश राहील.