डबलडेकर पूल इंदोराला जोडण्यासाठी दुसऱ्यांदा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:03+5:302021-07-14T04:12:03+5:30
वसीम कुरैशी नागपूर : मेट्रो रिच-२ अंतर्गत कामठी रोडवर बांधकाम सुरू असलेला डबलडेकर उड्डाणपूल लेव्हल-१ पासून इंदोरा चौकाला रॅम्पद्वारे ...
वसीम कुरैशी
नागपूर : मेट्रो रिच-२ अंतर्गत कामठी रोडवर बांधकाम सुरू असलेला डबलडेकर उड्डाणपूल लेव्हल-१ पासून इंदोरा चौकाला रॅम्पद्वारे जोडण्यासाठी एनएचएआयने दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.
एनएचएआय अधिकाऱ्यांनुसार डबलडेकरला इंदोरा चौकाला रॅम्पद्वारे जोडण्याचा प्रस्ताव पूर्वीपासून कंत्राटमध्ये सामील होता. त्यानंतरही कंत्राट दिल्यानंतर ४५ महिन्यानंतर हा प्रस्ताव पुढे येणे म्हणजे एक आश्चर्य आहे. हा प्रकल्प २८ महिन्यात पूर्ण करायचा होता. पूर्वीपासून मंजूर असलेला प्रस्ताव दुसऱ्यांदा का पाठविण्यात आला, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रकल्पात इंदोरा कनेक्टिंगला विसरल्याची चर्चा आहे. आठवण झाल्यानंतर पुन्हा हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची चर्चा आहे.
५.३ किमी लांब पुलावर इंदोरा चौकाला जोडून लगतच्या रहिवाशांना उड्डाणपूलाची सुविधा देण्यासाठी डबलडेकर ते इंदोरा चौकाला कनेक्टिंगमध्ये सामील केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामठी रोड डबलडेकर पुलाच्या बांधकामासाठी आपल्या वाट्यातून आतापर्यंत ४५० कोटी रुपये दिले आहेत. इंदोरा चौकावर रॅम्पचा प्रस्ताव प्रकल्पात पूर्वीपासून होता. रॅम्प दहा नंबर पुलाजवळ आणि बेलीशॉपजवळ उतरविण्यात येणार आहे.
काय म्हणतात अधिकारी
हे काम एनएचएआयच्या फंडातून होत असल्याने रॅम्प हवे वा नाही, ते ठरवतील असे महामेट्राचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी म्हटले आहे. एनएचएआयचे अधिकारी नरेश वडेट्टवार म्हणाले, महामेट्रोच्या इंदोरा चौकाजवळील रॅम्पचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविला आहे. तसे पाहता रॅम्प तयार करण्याचा प्रस्ताव पूर्वीच होता.